‘भारत माता की जय’ने परिसर दुमदुमला

0

एलएडी कॉलेजची ‘सेव्ह अर्थ वॉक रॅली’ उत्साहात

नागपूर, 20 जानेवारी

एलएडी आणि श्रीमती आर.पी. कॉलेज फॉर विमेनतर्फे  LAD and Mrs. R.P. By College for Women शनिवार, 20 रोजी पर्यावरण जागृतीकरिता ‘सेव्ह अर्थ वॉक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘पेड वर्षा लाते है, गर्मी से बचाते है’, ‘जय जवान जय किसान’ या नार्‍यांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे स्वागत प्राचार्या पूजा पाठक यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी हिरवा फेटा बांधून वसुंधरेला वाचविण्याचा संदेश दिला. रॅलीला प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि रॅली मार्गस्थ झाली. सकाळी 9 वाजता निघालेल्या या रॅलीत स्वतः कुलगुरू, प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक वर्ग एलएडी चौकापर्यंत गेले. रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थिनींनी वसुंधरेला वाचविण्याबाबत संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण केली. ‘पृथ्वीचे जतन करा, तीच आपले वतन’, ‘पृथ्वी वाचवा जीवन वाचवा’, ‘प्रकृतीच आपली संस्कृती’, ‘गो ग्रीन’ असे संदेश लिहिलेले फलक विद्यार्थिनींनी हातात घेतले होते. ही रॅली एलएडी कॉलेज चौक, व्हीएनआयटी, बजाजनगर, शंकरनगर अशी जाऊन एलएडी कॉलेजमध्ये परत आली. यानंतर रॅलीत सहभागी विद्यार्थिनींना नाश्ता देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्या डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्या डॉ. किरण पाटील, दीपाली चाहांदे, डॉ. मीनाक्षी कुळकर्णी, डॉ. अर्चना मसराम, कांचन बडे, डॉ. प्राची बागडे, डॉ. वर्षा भुजबळ आणि निलिमा सोनकांबळे आदींच्या मार्गदर्शनात झाले.

सेव्ह अर्थ वॉक रॅलीत सहभागी झालेले प्र-कुलगुरू यावेळी म्हणाले, लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याकरता ही संकल्पना फारच छान आहे. शाळा-कॉलेजमधून असे उपक्रम राबवायला हवे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीअंतर्गत या विषयावर विचार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच आपल्या मातृभाषेला महत्त्व देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.