Home Artical Blog आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते

आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते

0

नागपूर(Nagpur): नागपूरातील कोलबास्वामी सभागृह , टेलीफोन एक्सचेंज चौक येथे राष्ट्रीय आदिम कृती समितीची प्रचंड जाहीर सभेची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्वोती सावित्राबाई फुले व संविधान निर्माते भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास प्रमुख पाहुण्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केल्यानंतर झाली. राष्ट्रीय आदिम कृती समिती च्या या जाहीर सभाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कामगार नेते विश्वनाथ आसई तर राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आदिम नेत्या ॲड. नंदा पराते, दे. बा. नांदकर, प्रकाश निमजे, माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते हे आदिम मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आदिमच्या जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून कॅाग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व आदिम नेत्या ॲड. नंदा पराते ह्या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की विदर्भातील आदिम समाज ज्याकडे झुकतो, त्यांचे सरकार येते, इतकी प्रचंड एकता असून हलबा समाजाची एकता तोडण्यासाठी षडयंत्र झालेत म्हणून हलबांना प्रतिनिधित्व देत नाहीत. आदिम समाजातील नेते, कार्यकर्ते यांनी एकजुटीने आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आप-आपसात सहकार्याची भावना ठेवली तरच सामाजिक शक्ती उभी राहील. ज्या समाजाची सामाजिक बांधिलकीतून शक्ती उभी राहते, त्या समाजावर अन्याय करण्याचे राजकीय प्रयत्न होत नाही म्हणून आदिम हलबा, हलबी जमातीने सामाजिक शक्ती उभी करावी, असे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या सभेत आवाहन केले.
ॲड. नंदा पराते पुढे म्हणाल्या की मा. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने कोष्टी हा व्यवसाय असून हलबा, हलबी या जमातीचा घटना यादी समावेश असल्याप्रमाणे अनुसूचित जमात आहे असा स्पष्ट निकाल अनेक प्रकरणात दिला. या पार्श्वभूमीत भाजप शासनाने हलबांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या संविधान यादीत दुरूस्तीसाठी केंद्र शासनाला शिफारस पाठवावी अशी विनंती सातत्याने भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आदिमच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी फक्त आश्वासन देण्याशिवाय काहीही केलेले नाही. हलबा जमातीने विश्वास ठेवून भाजपला सत्तेत बसविले परंतु महाराष्ट्रात हलबांच्या समस्या जशाच्या तश्या कायम आहेत. भा.ज.पा.ने हलबा जमातीचा विश्वासघात केला आहे. असा आरोप करण्यात आला.


उमरेड च्या नगराध्यक्ष प्राजक्ता रोहीत कारू,नगरसेवक कल्पक भनारकर, स्विटी भिसीकर ,मोरेश्वर सोरते,तारेश्वरी बारापात्रे यांचे या प्रसंगी सत्कार करण्यात आले, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हलबा समाजात जागृती करण्यासाठी व न्याय आंदोलनात सहभागी होण्यासाठी तत्पर राहू अशी ग्वाही दिली.
आदिमचे संपादक प्रकाश निमजे म्हणाले की इंग्रज काळातील सन १९११ च्या एथनोग्रॉफीक सर्वे, सन् १८८१ व १८९१ ची जनगणना, सन् १९०५ व १९१६ च्या डॅा. ग्रीर्यसन, आर.व्हि.रसेल , मेजर आर.के.एम.बटे या इंग्रज प्रभूतींच्या अभ्यासपूर्ण अहवालाप्रमाणे लाखोंच्या संख्येत विदर्भात रहिवाशी म्हणून कोष्टी व्यवसायात असलेले हलबा , हलबी आहेत , आपली जमात, बोलीभाषा व धर्म यांचा त्याग न करता जनगणना मध्ये सहकार्य करावे, यासाठी समाजात जागृती करावी.
आदिमच्या विचारवंताच्या सभेत माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते म्हणाले ज्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नाही किंवा जात प्रमाणपत्र रद्द झाले, त्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे धोरणात्मक निर्णय महाविकास आघाडी सरकारने सन् २०१९ मध्ये घेतला परंतू या विरोधात जाऊन हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्यासाठी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेंशन बंद करण्यासाठी महायुती सरकारने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु ती याचिका फेटाळून लावली तरी भविष्यात सर्व सेवारत व सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांनी सतर्क राहून आरक्षण विरोधी शक्तींना उघडे करण्यासाठी समाजात जागृती करून एकजूट कायम ठेवावी.
राष्ट्रीय आदिम कृती समिती च्या जाहीर सभेचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कामगार नेते विश्वनाथ आसई म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयाने शकडो प्रकरणात निरीक्षण नोंदवून विणकरीच्या धंदयामुळे त्यांचा कोष्टी हा व्यवसाय असल्याने तपासणी समितीचे आदेश रद्द करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे न्याय निवाडे दिलेत तरी घटना यादीतील हलबा, हलबी या अनुसूचित जमातीवर अन्याय व अत्याचार अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती सातत्याने सुरू असल्याने प्रचंड रोष समाजात आहे, या समितीचा गैरकारभार विरोधात मोर्चा काढण्याचा ठराव झाला.
सभेचे संचालन धनराज पखाले तर प्रास्ताविक अभय धकाते , आभार प्रदर्शन नागोराव पराते यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी भास्कर चिंचघरे, महेश बारापात्रे , हरिश निमजे, कैलास निनावे, प्रा.डॅा. देवराम नंदनवार, ताराचंद बहारघरे, पुरुषोत्तम सेलुकर, राजू धकाते ,प्रदीप पौनिकर ,रघुनंदन पराते ,शेखर सेलूकर ,आकाश पौनीकर यांनी परिश्रम घेतले.