
MUMBAI मुंबईः भाजप BJP व शिवसेनेच्या SHIVSENA राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. नऊ महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार भाजप व शिंदेसेनेतील किमान १० आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापर्यंत शपथविधी होण्याची शक्यता असून त्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एक किंवा दोन महिलांनाही स्थान दिले जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
मागील नऊ महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा सुरु आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर १९ जूनला येणारा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तो दणक्यात साजरा करण्याचे शिंदेंचे नियोजन आहे. तत्पूर्वी पक्षाचे आणखी १० मंत्री वाढावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उर्वरित 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपकडून संजय कुटे, योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी. रणधीर सावरकर, गणेश नाईक, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, देवयानी फरांदे यांच्यापैकी आमदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे . तर शिवसेनेकडून याेगेश कदम, भरत गोगावले, बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, संजय शिरसाट, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, सुहास कांदे या आमदारांपैकी काहींना संधी मिळेल, असे मानले जात आहे. केंद्रातही शिवसेनेच्या किमान दोन खासदारांना संधी मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत. यासाठी प्रतापराव जाधव, गजानन कीर्तिकर व राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे.