नागपूर : विरोधी पक्षांनी भाजपचा मिळून सामना केल्याशिवाय त्याचा पराभव होणार नाही. असा पराभव अपेक्षित असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar )यांनी नागपुरात बोलताना व्यक्त केले.
मविआतील घटक पक्षांनी अहंकार कमी केला तर भाजपचा पराभव शक्य आहे, असा सल्ला देताना आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस स्वतःला आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष मानण्याचा समंजसपणा दाखवेल असे वाटत नाही. महाविकास आघाडीतील संभाव्य प्रवेशाचा मुद्दा आपण उद्धव ठाकरेंवर सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी असल्याचे उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावरच सोडून दिली आहे, असे ते म्हणाले.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. पटोलेंच्या या विधानामुळे आघाडीतील बिघाड दिसून येतो, असे ते म्हणाले.