बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोमात , मनपा आरोग्य विभाग कोमात !!!!!

0

२६. ११.२०२१ पासून अपर आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली ९ तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत करूनही आजवर एकाही बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या दोन वर्षात कारवाई नाही- समिती बरखास्त करण्याची एनसीपी अर्बन सेलची मागणी .

नागपूर शहरात पैशांच्या लालसेपोटी बोगस वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्यांकडून निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. वैद्यकीय हलगर्जीपणा, उपचारासाठी वाढीव बिले काढल्या जात असल्याचेही प्रकार चर्चेत आहेत .अगदी शहरातही गल्ली-बोळांत यांचे छोट्या गाळ्यांमध्ये धंदे सुरू आहेत. यात काही आसाम , पश्चिम बंगाल , महाराष्ट्रातीलही प्रतिबंधित पदव्या घेतलेले लोक आहेत. काही लोकांकडे खोटी कागदपत्रे सादर करून मिळवलेल्या ‘आरएमपी’म्हणून वैद्यकीय प्रॅक्टिसचे परवाने आहे. सामान्य नागरिकांना बोगस डॉक्टर कसा ओळखावा याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्टरकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते. बोगस डॉक्टरांनी अनेकदा चुकीचे उपचार केल्यामुळे रुग्णांच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आहे ,काही वेळा रुग्णांना कायमचे अपंगत्व येते तर रुग्णांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत यावर कार्यरत समितीने पोलीस यंत्रणेची मदत घेऊनअ धिक सक्षमपणे कामकाज करुन अधिकाधिक बोगस डॉक्टर शोधून काढले पाहिजेत.

महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसायिकांना महाराष्ट्र वैद्यक परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद व महाराष्ट्र दंत वैद्यक परिषद या चार वैधानिक परिषदांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या तरतुदीचा भंग करणाऱ्याविरुध्द १ ते ३ वर्षाची कारावासाची शिक्षा असून आर्थिक दंडाचीही त्यामध्ये तरतूद आहे. जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायीकांना हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी २६. ११.२०२१ पासून अपर आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली ९ तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली तरीही आजवर एकाही बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या दोन वर्षात एकही कारवाई नाही हि निष्क्रियता असून महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कवडीचाही गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे असं आरोप या वेळी एनसीपी अर्बन सेलचे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी केला . या निष्क्रिय समितीला बरखास्त करून नवीन समिती गठीत करावी , अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत,अचानक तपासणीची धडक मोहीम राबवावी हि मागणी एन सी पी अर्बनसेल द्वारे मनपा चे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिर्मवार यांना करण्यात आली आणि धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी अर्बनसेलचे शहराध्यक्ष श्रीकांत शिवणकर, मनपा समिती प्रमुख संजय जोशी, एकनाथ फलके, संदीप खंगार, देविदास चंद्रायन, संदीप उके, मेहबूब पठाण, सचिन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.