
गोंदिया GONDIYA – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिलं यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय निवडणूक आयोग ही भाजपाची स्क्रिप्ट वाचत असून त्यानुसारच काम करत आहेत. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत आणि आता शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीत जे निर्णय घेतलेले आहेत त्यावरून हे स्पष्ट होते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेता जे.पी नड्डा JP Nadda यांनीच म्हटले होते की देशातले राजकीय स्थानिक पक्ष संपवायचे आहेत आणि त्या दृष्टीने आता भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकारद्वारा घेण्यात येत आहेत असा आरोपही पटोले यांनी केला.
मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांचे ते वैयक्तिक प्रश्न आहेत म्हणून आज ते महाराष्ट्रकडून टोल वसूल करतायेत का? गरीब कामगारांच्या विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपमध्ये कमिशन वसूल करतात आणि मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खातात असे हे कमिशनखोर सरकार आहे.मनसे नेत्यांची वर्षा आणि सागर बंगल्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने खलबतं सुरू आहेत यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सागर बंगल्यावर काय होते सर्वांना माहितच आहे. ईडीमार्फत धमकावून काय केलं जाते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यांचे आमदारच म्हणतात की आम्ही काहीही केलं तरी आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. शासकीय सागर बंगल्याचा अपमान करण्याचं काम भाजपा नेते करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.