बावनकुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
नागपूरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (BJP State President Chandrashekhar Bawankule) रविवारी नागपुरात केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. “आपण प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असे विधान बावनकुळे यांनी केले आहे. पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे यांनी हे विधान केले आहे. फडणवीस यांनी त्यांच्याकडे न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला, त्याच्यासाठी त्यांनी काम केले आहे. मराठा, धनगर, ओबीसी अशा सर्वांसाठी त्यांनी काम केले. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे” असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.
फडणवीस हे जाती-पातींच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजांसाठी काम करतात म्हणून आपलीही जबाबदारी आहे. २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे, असे नमूद करून बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे काय झाले पाहिजे, असा सवाल करताच उपस्थितांनी ‘मुख्यमंत्री’ असे उत्तर दिले. बावनकुळे पुढे म्हणाले, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बावनकुळे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. याबद्धल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे उत्तर पवार यांनी दिले. हा प्रश्न दोन पक्षांचा आहे, त्यात आम्ही नाक खुपसणार नसल्याचेही ते म्हणाले.