नागपूरः राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) उद्या सोमवारपासून नागुपरात सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने आयोजित चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा विरोधी पक्षांनी केली आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी (Maharashtra Opposition Leaders) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी चहापानावरील बहिष्काराची घोषणा करताना विरोधकांचे मुद्दे मांडले. “राज्यात सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. मात्र, या कालावधीत सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. महापुरुषांबाबत सातत्याने बेताल वक्तव्ये करणे, अपशब्द बोलणे हे सातत्याने सुरूच आहे. राज्यपाल, मंत्री, आमदार बेताल बोलत आहेत आणि त्यात भर टाकण्याचे काम करत आहेत. काही बाबतीत ते माफी मागण्यासही तयार नाहीत. हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाही” असे अजित पवार म्हणाले.
हे अधिवेशन तीन आठवड्याचे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, अशी टीका करून पवार म्हणाले, आम्हाला अनेक प्रश्न मांडायचे आहेत. सीमा प्रश्नाबाबत सरकारने अद्यापही पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असा आरोप पवार यांनी केला.
राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोक आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा, असे आव्हानही पवार यांनी दिले.
मी काही ज्योतिषी नाही-पवार
२०२४ पर्यंत विरोधकांची एकजूट राहणार काय, हे आता सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे उत्तर अजित पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिले. आम्ही ज्योतिषी नाही व ज्योतिषांकडे जात नाही नाही, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे, या बावनकुळे यांच्या वक्तव्यावर पवार यांनी उत्तर टाळले. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्यात आम्ही नाक खुपसणार नसल्याचे ते म्हणाले.
विदर्भावर अन्याय केला नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर अन्याय केल्याचे आरोप धादांत खोटे आहेत, असे अजित पवार यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. आम्ही विदर्भावर कधीही अन्याय केला नाही. कोट्यवधीच्या सुप्रमा आम्ही सिंचन प्रकल्पांना त्यावेळी दिल्या होत्या. प्रकल्प लवकर व्हावे, यासाठी प्रयत्न केले. आम्ही फायली तातडीने काढायला गेल्यावर काय घाई आहे, असे प्रश्न विचारले गेले. आम्ही असताना विदर्भ व मराठवाड्यात धडाडीने काम केले. आम्ही अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, आरोपांमुळे अधिकारी काम करायला तयार नव्हते. त्यामुळे प्रकल्प रेंगाळले झाले. त्यानंतरच्या २०१४ ते १९ या फडणवीस सरकारच्या काळात किती प्रकल्प मार्गी लागले, याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे, असे आव्हान पवार यांनी दिले. मागील अडीच वर्षात आम्ही प्रयत्न केले. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र आमचा आहे, या भावनेने काम केले. मात्र, आताचे हे सरकार स्थगिती सरकार आहे. मागील सरकारने जी काहीकामे मंजूर केली होती, त्यांना यांनी स्थगिती दिली असून त्यात विदर्भाची कामे अधिक आहेत. विदर्भाला आम्ही अधिकचा निधी देत होतो व दिलाच पाहिजे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी विरोधी पक्ष नेते दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते सुनील केदार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
मविआची बैठक
दरम्यान, या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनातील डावपेंचावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.