शिवसेना व धनुष्यबाणावरील दावा उद्धव ठाकरेंनी गमावला, शिंदे गटाचा दावा मान्य

0
  • निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः राज्याच्या सत्तासंघर्षातील पहिला लढा एकनाथ शिंदे यांच्या गटानं जिंकला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील शिंदे गटाचा दावा मान्य केला असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत करण्यात आले आहे तर ठाकरे गटाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत हा खोक्यांचा विजय असल्याचा आरोप केला आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ४० आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा झाला होता. या गटाने नंतर भाजपसह राज्यात सत्ताही स्थापन केली. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाहीत, असा दावा करीत शिंदे गटानं शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगितला होता. शिंदे व ठाकरे गटातील हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगापुढे आपापले लेखी दावे सादर केले. यासाठी शेकडोच्या संख्येने दस्तऐवज तसेच लाखो शपथपत्रे दोन्ही गटांकडून सादर झाली. आयोगापुढे झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांकडून युक्तिवाद देखील झाले. त्यानंतर आयोगाने आपला निर्णय जाहीर करीत शिंदे गटाचा पक्ष व निवडणूक चिन्हावरील दावा मान्य केला आहे. शिंदे गटाला एका शिवसेना या नावाचा तसेच निवडणूक चिन्हाचा वापर करता येणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाला असेही आढळून आले की शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे अलोकतांत्रिक प्रथा परत आणल्या गेल्या आणि पक्षाला खाजगी जागेवर आणले. या पद्धती निवडणूक आयोगाने 1999 मध्ये नाकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेतील उद्धव गटाचा दावा संपला आहे.

काय म्हणाले निवडणूक आयोग

  1. 21 जूनला 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्याच दिवशी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली गेली. परंतु 21 जूनलाच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 34 आमदार होते. त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले. त्यामुळे अजय चौधरींची झालेली निवड बेकायदेशीर होती, असे आयोगाने नमूद केलेय. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.
    हा खोक्यांचा विजय-संजय राऊतांची टीका

ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. तोच खोक्यांचा वापर लक्षात घेता हा तोच विजय आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आता स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते म्हणाले, जो पक्ष बाळासाहेबांनी लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला.
तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला आहे.देशातील सगळ्या स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. न्यायव्यवस्था देखील गुलाम असल्यासारखं वागत आहेत.
४० बाजारबुणगे हे पैशांच्या जोरावर पक्ष विकत घेत असतील सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे.
जे काही झाले ते सगळे दबाबातून झाले आहे. असे मला वाटते. निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. जो निर्णय आला आहे तो विकत घेतलेला आहे. खोके सरकार त्यांनी हे सगळे केले आहे. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आम्ही पुन्हा कायद्याची लढाई लढणार आणि नवी शिवसेना उभारणार.
सगळ्या संस्था आता सरकारच्या गुलाम झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा लढाई लढणार आहे.

निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे

कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.