ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार

0

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) यांना निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भात बोलताना नार्वेकर यांनी एक महत्वाची माहिती उघड केली आहे. आपल्याला केवळ शिंदे गटाच्या 16 आमदारांबाबत नव्हे तर शिवसेनेच्या सर्वच 54 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नार्वेकर म्हणाले, शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे कोणतेही लेखी निवेदन माझ्यापुढे अद्याप सादर झालेले नाही. त्यामुळे केवळ 16 नव्हे तर शिवसेनेच्या सर्व 54 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

 

नार्वेकर म्हणाले की, रिझनेबल कालावधीत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक याचिकाकर्त्यांला आणि प्रतिवादीला बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल. साक्ष व उलटतपासणी होईल. नैसर्गिक न्याय तत्त्वाचे आणि पुरावा कायद्यातील तरतुदींचे पालन केले जाईल. त्यामुळे सुनावणीसाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगता येणार नाही. पण लवकरात लवकर निर्णय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.