‘एम्स’ पेक्षा बरा आपल्या गावातील डॉक्टर

0

रुग्णाच्या नातेवाइकाची व्यथा ,एम्सलाही लागला ‘डामा’चा आजार


नागपूर. गरीबांसाठी नागपुरात हक्काचे रुग्णालय म्हणून मेडिकल, मेयो (medical, mayo ) ओळखले जातात. मात्र, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) उभारल्यानंतर येथे तातडीने उपचार मिळतील या आशेवर मोठया संख्येत रूग्ण येत आहेत. परंतु, अपघातामध्ये गंभीर दुखापत झालेल्या एका रुग्णाला शस्त्रक्रियेची तातडीने गरज असताना चोवीस तास ताटकळत ठेवले. तपासणी केल्यानंतर डामा (Discharge Against Medical Advice) घेण्यास भाग पाडले. एम्समधील अनुभवाने या नातेवाईकाच्या रूग्णाने ‘आपल्या गावचा डॉक्टर बरा’ (doctor of our village is fine ) अशी व्यथा सांगावी लागली. या रुग्णाला अखेर ब्रह्मपुरीतील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया उरकून घ्यावी लागली. हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी बरीच प्रकरणे यापूर्वी पुढे आली आहेत. खाटांची संख्या कमी असल्याने ही वेळ ओढवल्याचे सांगितले जात आहे.
ब्रह्मपुरीतील आरोग्य विभागात फायलेरिया विभागात कार्यरत 32 वर्षीय युवक अपघातामध्ये जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून 12 डिसेंबरला मध्यरात्रीनंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलवले. एम्समध्ये उपचार होतील या आशेवर रुग्णवाहिकेतून एम्समध्ये आले. रात्रभर रुग्णाला स्ट्रेचरवरच ठेवण्यात आले. या दरम्यान एक्स रे, सोनोग्राफी करण्यात आली. अस्थिरोग विभागातील डॉक्टरांनी 13 डिसेंबरला दुपारी एक वाजता बघितले. मांडीचे हाड मोडले होते. वेदनेने विव्हळत असल्याने या रुग्णावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. मात्र शस्त्रक्रियेसाठी पंधरा दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी मेडिकलमध्ये किंवा इतर रुग्णालयात रेफर करण्याची विनंती केली. मात्र डॉक्टरांनी रेफर करणार नाही, डिस्चार्ज घ्या, असा सल्ला दिला. अखेर नातेवाइकांनी डिस्चार्ज घेतला मात्र एम्सच्या डायरीत ‘डामा’ (डिसचार्ज अगेन्ट मेडिकल अडवाईस) अशी नोंद केली. यासंदर्भात एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

मेयो-मेडिकलच्या वाटेवर एम्स
ब्रम्हपुरीतून एम्समध्ये उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी वेटिंग लिस्टमुळे रुग्णावरील शस्त्रक्रियेसाठी 15 दिवस थांबावे लागेल असे स्पष्ट केले. नातेवाइकांना रुग्णाच्या वेदना बघवत नसल्याने त्यांनी परत जिथून आणले तेथेच परत नेले. अनेकांकडून मदत मागत येथील एका खासगी रुग्णालयात बुधवार,14डिसेंबरला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मेयो, मेडिकलमध्येही अशाच प्रकारे वेटिंग लिस्ट असल्याने रुग्ण खासगीत शस्त्रक्रियेसाठी मेडिकल,मेयोतून डामा घेतात. त्याच वाटेवर आता एम्सची वाटचाल सुरू झाली असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आता रुग्णाचे नातेवाईकाने बोलून दाखवित आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा