
नागपूर(Nagpur), दि. १२ मे: परिचारिकांचा सन्मान आणि त्यांचं आरोग्य संवर्धन याकरिता कटीबद्धतेची ग्वाही देत डॉ. दंदे फाउंडेशनच्यावतीनं जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. दंदे फाउंडेशनचे डॉ पिनाक दंदे म्हणाले, की, रुग्ण सेवेच्या क्षेत्रात परिचारिकांचा सेवा भाव अतुल्य आहे. नर्सिंग हे प्रोफेशन असलं, तरी सिस्टर्समधील सेवाभावाशिवाय रुग्णसेवा शक्य नाही. त्यामुळे परिचारिकांचा सन्मान जपला गेला पाहिजे आणि त्यांच्या सन्मानात वाढ झाली पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन करताना डॉ. पिनाक दंदे पुढं म्हणाले, की परिचारिकांचं स्वास्थ्य रक्षण आणि मानसिक – शारिरीक आरोग्य संवर्धन महत्वाचं आहे. याकरिता डॉ. दंदे फाउंडेशन जबाबदारी घेईल. यावेळी फाउंडेशनच्यावतीनं परिचारिकांकरिता संपूर्ण शारीरिक-मानसिक आरोग्य चिकित्सेचीही घोषणा करण्यात आली.
डॉ. दंदे फाउंडेशनच्यावतीनं आयोजित या कार्यक्रमात सेवावृत्तीनं काम करणा-या आजी-माजी परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. सिस्टर आशा सरदार, सिस्टर गीता माने यांच्यासह नवोदित परिचारिकांच्या कामाचीही यावेळी गौरवपूर्ण दखल घेण्यात आली. फाउंडेशनच्यावतीनं परिचारिकांचं अपग्रेडिंग करण्याकरिता विशेष कौशल्य कार्यक्रमांचं आयोजन करण्याची भूमिकाही यावेळी विषद करण्यात आली. कार्यक्रमाचं प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन व्हिक्टोरिया सोनी यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विभा देशपांडे, विशाखा बागडे, आशिष वाराणशीवार यांनी योगदान दिलं.
परिचारिकांना असतो स्ट्रेस…
परिचारिका दिनाच्या निमित्तानं झालेल्या संवाद कार्यक्रमात एक बाब प्राधान्यानं समोर आली, की परिचारिका आई-पत्नी-बहिण अशा विविध रुपात परिवारातील जबाबदारी सांभाळते. त्याचवेळी ती रुग्णालयात रुग्णसेवेतही तत्पर असते. या दोन्ही जबाबदा-यांचा कळत-नकळत शारिरीक आणि मानसिक ताण असतो. हे लक्षात घेता परिचारिकांकरिता विशेष रिक्रिएशन्सच्या योजना राबविण्याची गरज आहे. रुग्णालय हे विस्तारित कुटुंब आहे. कुटुंबात जसा हेल्दी संवाद आणि परस्पर काळजीचा विषय असतो, तसाच विषय रुग्णालयातही असावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली…

















