
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी (Disqualification of Shiv Sena MLA`s) उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय लांबणीवर गेला आहे. ४० आमदारांना २ आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे विधिमंडळ सचिवालयाच्या सूत्रांनी सांगितले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) त्यांना दिली आहे. पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणीला सुरुवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना त्यासंदर्भात पुरावे देखील सादर करावे लागणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय होणार नसल्याचे निश्चित झाले आहे. Extension of term for 40 MLAs on the issue of disqualification
शिवसेनेच्या ४० आमदारांनी विधिमंडळाच्या नोटीसीला उत्तर देताना मुदतवाढ मागितली आहे. विधिमंडळाकडून शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेच्या मुद्यावर नोटीस पाठवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांमध्ये झालेल्या या बैठकीत आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावर चर्चा झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्या नोटीसीला उत्तर दिले आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या या आमदारांनी मुदत वाढवून मागितल्याचे लक्षात आले होते. उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांनाही नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या उत्तरांचा आढावा घेणे बाकी असले तरी ठाकरे गटाने नोटीसीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली होती, हे विशेष. या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून अपात्रतेचा मुद्दा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे.