मानवरहीत चाचण्यानंतरच गगनयान प्रक्षेपण होणार : इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांची माहिती

0

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘गगनयान मिशन’ची घोषणा केली होती. ते लक्ष्य २०२२ मध्ये साध्य करावयाचे होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. त्यामुळे सहा महत्वपूर्ण चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर मानव अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्याबाबत ठरवण्यात येईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष तसेच अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली.
गगनयान मिशन अर्थात भारताकडून मानव अंतराळात पाठविण्याचे अभियान. यासाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या (Indian Science Congress) दुसऱ्या दिवशी इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी अंतराळ विज्ञानावर आयोजित सत्रामध्ये भाग घेतला.त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले.
डॉ. सोमनाथ म्हणाले की, भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालय, संबंधित विभाग आणि मंत्रालयांशी सल्लामसलत करील,असे सोमनाथ यांनी सांगितले.
चांद्रयान ३ मोहीमेबाबत त्यांनी सांगितले की, या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून सेफ लॅण्डींगवर आमचा भर आहे. चांद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चांद्रयान १ आणि 2 नंतर इस्रो लवकरच चांद्रयान-३ लाँच करणार आहे. चांद्रयान-३ चे काम वेगाने सुरू आहे. भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-३ मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चांद्रयान-३ मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. चांद्रयान-३ अगदी चांद्रयान-२ सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे असे सोमनाथ यांनी सांगितले.
सोमनाथ म्हणाले की नवीन धोरणामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन आणि विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच या क्षेत्रात खाजगी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रोचा प्रयत्न राहणार आहे. अनेक भारतीय खाजगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. केंद्र सरकार यासाठी अनुकूल आहे.
खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याने जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होऊन सक्षम होईल आणि त्यामुळे अवकाश आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण होतील, असे सोमनाथ यांनी सांगितले. बंगळुरू येथे इस्त्रोच्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. फक्त भूमिअधिग्रहण राहिले आहे. तेवढे झाले की लगेचच बांधकाम सुरू केले जाईल असे ते म्हणाले.
सोमनाथ म्हणाले की, अंतराळ कचरा ही मोठी समस्या आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे. कचऱ्याच्या रूपातील कोट्यवधी निरुपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. सोडल्या जाणाऱ्या नव्या उपग्रहांना यातले काही निरुपयोगी उपग्रह अथवा कचऱ्यामधील काही घटक धडकण्याची शक्यता असते.