गोंदिया, ८ मे (हिं.स.) : आठवडी बाजार करून सायकलने घरी परत जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना गंगाझरी पोलिसांनी अटक केली आहे. घडले प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी 1440 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत पांगडी येथील कैलास उईके (35) हे शहारवाणी येथील आठवडी बाजारात सामान आणण्याकरता गेले होते. घरी परत जात असताना शहारवाणी तलावाजवळ आरोपी खेमचंद उर्फ मिथुन मडावी (28) व ओमकार पुसाम (30, रा. शहारवाणी) यांनी कैलाश उईके यांना अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळील रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती. उईके यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम 392, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने जबरी चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन आरोपी खेमचंद मडावी व ओमकार पुसाम यांना अटक केली. आरोपींजवळून पोलिसांनी 1440 रुपये रोख व गुन्ह्यात दुचाकी क्रमांक एमएच 35 एम 8254 हस्तगत करण्यात आली आहे.