
बारामती (Baramati):-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते दिवंगत अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना आज बारामतीत उपस्थित लक्षावधी चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवारी सकाळी घडलेल्या एका विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिल्यानंतर, मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पोलिसांनी २१ तोफांची सलामी दिली आणि त्यानंतर १२ वाजून ११ मिनिटांनी अजितदादांचे पुत्रांनी पार्थिवाला अग्नी दिला आणि दादा अनंताच्या प्रवासाला मार्गस्थ झाले… बुधवारी सकाळी बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात प्रचार सभा घेण्यासाठी म्हणून मुंबईहून दाखल झालेल्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाल्याने अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्राचे तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. निधनाचे वृत्त कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नितीन, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मनसेचे राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, नीलमताई गोर्हे,पंकजा मुंडे, अदिती तटकरे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवार, सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण, हर्षवर्धन चव्हाण, गिरीश महाजन, सुशीलकुमार शिंदे, अमोल कोल्हे, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली. दिवंगत नेत्याचे अंतिम दर्शन घेत असतानाच पवार कुटुंबातील शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांचे सांत्वन देखील ही मंडळी करीत होती.

गुरुवारी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कळताच राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांचा ओघ बारामतीच्या दिशेने वळू लागला. “परत या परत या अजितदादा परत या”, “अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे”, अशा घोषणांनी या परिसरातील सारा आसमंत निनादला होता. पवार कुटुंबाचे जन्मस्थान असलेले काठेवाडी हे गाव देखील आज अश्रुंनी चिंब भिजले होते. सकाळी काही काळासाठी अजितदादांचे पार्थिव काठेवाडी गावातील त्यांच्या घरी आणण्यात आले होते. तेथे त्यांना पोलिसांनी मानवंदना देखील दिली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या एका वाहनातून त्यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या पवारांच्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात आणण्यात आले. काठेवाडी ते बारामती हा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता आज दादांच्या समर्थकांनी तुडुंब भरला होता. गर्दीतून वाट काढत दादांचे शव असलेले वाहन मार्गक्रमण करीत होते. विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात देखील दादांचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
फुलांनी सजवलेल्या एका मंचावर रचलेल्या लाकडांच्या चितेवर अजित दादांचे पार्थिव ठेवले जाताच पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. दादांच्या तालमीत तयार झालेल्या, त्यांनी घडवलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आज अश्रू अनावर झाले होते. तिरंग्यात गुंडाळलेला देह, वाहनावर लावलेला त्यांचा भला मोठा कृष्ण धवल फोटो,, अंत्यदर्शनासाठी जमलेली अलोट गर्दी, काठेवाडी ते बारामती दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो लोक असे चित्र आज बारामतीत बघायला मिळाले.














