नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी विजयाची नोंद केली. १८२ पैकी १५६ जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसचा सफाया झाला तर मोठाल्या घोषणा करणाऱ्या आम आदमी पार्टीला फारशी समाधानकारक कामगिरी साध्य करता आली नाही. आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसच्या कामगिरीवर प्रभाव पडल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात भाजपची स्थितीही बरीच मजबूत होती, असे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची मते एकत्र केली तरी हे दोन्ही पक्ष भाजपची बरोबरी करू शकत नसते, (BJP`s Big Win in Gujarat)असे आकडेवारी सांगते. या निवडणुकीत आप आणि काँग्रेसची मते एकत्र केली असती तरी भाजपला १२३ जागा सहज मिळाल्या असत्या, असे मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गुजरातमध्ये आजघडीला भाजपची स्थिती किती मजबूत आहे, याची कल्पना येते.
२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपच्या जागांमधील अंतर बरेच कमी होते. सौराष्ट्रमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता. याशिवाय पाटीदारांचे आंदोलनही भाजपच्या खराब कामगिरीला त्यावेळी कारणीभूत ठरले होते.
यावेळी भाजपने पाटीदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यात यश मिळविले. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघ निहाय बारीक सारीक गोष्टींवर लक्ष पुरविले. अगदी मतदारसंघात वस्तीनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त मतदारांना बुथवर कसे पोहोचविता येईल, याचे नियोजन भाजपने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अंमलात आणले व त्याचा पक्षाला मोठा फायदा झाला. गुजरातमध्ये कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने परिश्रम घेतले, ती स्थिती अन्य राज्यात कुठेही दिसत नाही, असे मतही भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून व्यक्त झाले आहे. काँग्रेस व आपने ३३ मतदारसंघांमध्ये एकमेकांचे नुकसान केले आहे.
गुजरातच्या ग्रामीण भागात आप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे शहरी भागांमधील मतदारसंघांमध्ये भाजपला मोकळे रान मिळाले. भाजपने याचा पुरेपूर फायदा उठवत शहरी भागांमधील ४५ पैकी ४२ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. यापैकी केवळ एका मतदारसंघामध्ये आप आणि काँग्रेसच्या एकत्रित मतांची संख्या भाजपपेक्षा जास्त आहे. तर ३८ मतदारसंघांमध्ये भाजपने निम्म्यापेक्षा जास्त मते मिळवली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाची मते एकत्र केली तरी भाजपचा पराभव अशक्य होता असे आकडे सांगतात. काँग्रेस आणि आपची मते एकत्र केली तरी भाजपला फारतर १२३ जागांपर्यंतच रोखता आले असते, असे गुजरातचे राजकीय चित्र आहे.