मुंबई- उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मिळविण्यासाठीच मनसेचे मुंबईतील नेते संदीप देशपांडे यांच्यावर (Attack on MNS Leader Sandeep Deshpande) काही महिन्यांपूर्वी हल्ला करण्यात आल्याची कबुली या घटनेतील हल्लेखोराने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. संदीप देशपांडे यांच्यावर अशोक खरात या हल्लेखोराने हल्ला केल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. या घटनेमुळे उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल, असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एक जण अद्याप फरार असल्याची माहिती आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करीत असताना 3 मार्च रोजी ही घटना घडली होती. चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेटच्या स्टम्प्सच्या साह्याने त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत ते जखमी झाले होते. हल्ला करताना हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. मात्र, नंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांचे चेहरे समोर आले होते. यासंदर्भात गुन्हे शाखेने प्रमुख आरोपी अशोक खरात याची चौकशी केली असता उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यास आपल्याला बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी असलेले खरात यांनी हे पाऊल उचलले होते, अशी कबुली दिली आहे. या हल्ल्यात अद्याप तरी राजकीय अँगल नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.