उसनवारी करून घेतला मोबाईल, तगाद्यामुळे केली आत्महत्या

0

भंडारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना


भंडारा. मिसरूड फुटण्याच्या वयातील तरुण मोबाईलबाबात फारच क्रेझी झाला. उसनवारी करीत त्याने मोबाईल खरेदी केला (Borrowed money and bought a mobile phone). पण, त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. उसने दिलेले पैसे परत मिळण्यासाठी पाच जणांनी तगादा लावला. तो दिसेल तिथे तरुणाकडे पैशांची मागणी केली जात होती. सर्व प्रयत्न करूनही त्याला पैसे परत देणे शक्य होत नव्हते. दुसरीकडे त्रास वाढतच होता. अखेर कंटाळून तरुणाने आत्महत्येचा पर्याय निवडला (Committed suicide due to mental distress). अज्ज्वील काटेखाये (१८) रा. चिचाळ, भंडारा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वडील दिलीप काटेखाये यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. अज्वील याने कोंढा येथील १७ वर्षीय तरुणाकडून मोबाईल खरेदीसाठी १० हजार ५०० रुपये उसने घेतले होते. उसने दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी धीरज माकडे (रा. कोंढा), निखील चंद्रशेखर घोळके (२०), रजत हंसराज घोळके (१७) व पारस नरेंद्र बिलवणे (१६) सर्व रा. चिचाळ व समीर रामकृष्ण कूलरकर (४३, रा. अड्याळ) यांनी अज्वीलला त्रास देणे सुरू केले. त्यामुळे अज्वीलने आपल्या वडिलांची दुचाकी समीरकडे गहाण ठेवली होती. तरीही पैशाकरिता तगादा लावल्याने अज्वील तणावात होता. सततच्या त्रासाला कंटाळून त्याने गोसे धरणाच्या लहान पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

दुप्पट पैशाचे आमीष दाखवून ३९ लाखांचा चूना
भंडारा जिल्ह्यातूनच फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे दुप्पट करून देण्याचा नावावर जवळपास ३९ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार तुमसर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी कुंजनलाल भोंडेकर (३०), मृणाली शहारे (२५) व ओमप्रकाश रमेश गायधने (३३ ) यांच्याविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्गेश सुरेश कनोजे (३५, रा. रविदास नगर, तुमसर) यांनी ट्रेडविन मल्टीसर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, वर्थ मोटिव ट्रेड इन्फिनिटी मल्टी सर्विसेज कंपनीमध्ये ३८ लाख ७७ हजार ६० रुपयांची गुंतवणूक केली होती. कालावधी संपल्यानंतर दुर्गेश कनोजे यांनी पैसे परत मागितले असता तिन्ही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कनोजे यांनी तुमसर पोलीस स्टेशन गाठून आरोपी कुंजनलाल भोंडेकर, मृणाली शहारे व ओमप्रकाश रमेश गायधने यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.