
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अग्निशमन सेवा सप्ताहाला प्रारंभ
नागपूर (Nagpur) दि. १४ एप्रिल २०२६ :-
गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत महानिदेशक अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा व होमगार्ड यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे मंगळवारी अग्निशमन सेवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासोबतच १४ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचाही समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयचे संचालक डॉ. ए. आर. सोनटक्के होते, तर प्रमुख पाहुणे मिनरल एक्स्प्लोरेशन अँड कन्सलटंसी लिमिटेडचे संचालक (वित्त) सुरेंद्र एस. क्षत्रिय होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर अग्निशमन कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, अग्निशमन वाहनांच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या रॅलीमध्ये हजमत, इमर्जन्सी रेस्क्यू टेंडर, क्रॅश फायर टेंडर, वायरलेस व्हॅन, ब्रीदिंग अॅपरेटस (बीए) व्हॅन, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म तसेच वॉटर टेंडर अशा अत्याधुनिक वाहनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

सुरेंद्र क्षत्रिय यांनी अग्निशमन सेवा दिन व सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित करताना रुग्णालये, शाळा तसेच समाजात अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्याचे आवाहन केले. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके व प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यावर्षीची संकल्पना “सेफ स्कूल, सेफ हॉस्पिटल अँड फायर सेफ्टी अवेअर सोसायटी– टुगेदर फॉर फायर प्रिव्हेंशन’ ही आहे, अशी माहिती डॉ. ए. आर. सोनटक्के यांनी दिली.
गार्ड कमांडर हर्ष केशरवानी (प्रशिक्षक) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ डेमॉन्स्ट्रेटर रमेश चंद्र मणिहार यांनी केले. या प्रसंगी बी.टेक (फायर इंजिनिअरिंग)चे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी अधिकारी, मान्यवर अतिथी, अधिकारी, माजी विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



















