हायटेक बस आल्या, मोरभवन कधी झटकणार मरगळ

0

 

11 फलाटावरून धावते आपली बस

नागपूर. शहर बस सेवा मनपाला (NMC) हस्तांतरीत झाल्यानंतर शहराच्या मध्यवतीं भागात असलेल्या मोरभवनच्या (Morbhavan) ताब्यावरून एसटी महामंडळ (MSRTC) आणि मनपा यांच्यात चांगलाच वाद झाला. महत्प्रयत्नाने मनपाला आपली बससेवा मोरभवनच्या चार फलाटावरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. आता तब्बल 11 फलाटावरून आपली बस शहरात धावत आहे. बसस्थानकात घुसखोरी करण्याची मनपाला परवानगी मिळाली असली तरीही या स्थानकाचा अत्याधुनिक विकास करण्याचा प्रस्ताव मात्र रखडला आहे. मोरभवनला हायटेक करण्याचे मनपाचे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. भंगार बसेसची जागा आता हायटेक इलेक्ट्रीक बसेसने घेतली आहे. बसस्थानकावरील मर्गळही झटकून तेसुद्धा स्मार्ट व्हावे, अशी नागपूरकरांची अपेक्षा आहे. स्वस्त पर्याय म्हणून नागपूरकारांकडूनही आपली बस सेवेला पसंती मिळते आहे. त्याचवेळी प्रशासनानेही प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

सेवानिवृत्तांच्या भरोश्यावर देखभाल
मोरभवन बसस्थानकाच्या आतील भागातील संपूर्ण परिसराचे काही वर्षापुवीं डांबरीकरण करण्यात आले होते. सद्य:स्थितीत मोरभवनचे संचालन एसटी महामंडळाकडे आहे. येथून एसटी महामंडळासाठी केवळ 6 फलाट आहे. तर, मनपासाठी 11 फलाट आहे. प्रारंभी एसटी विभागने मनपाला आपली बससाठी 3 फलाट भाडेतत्वावर दिले होते. त्यानंतर पुन्हा 8 फलाट भाडेतत्वावर देण्यात आले. त्यामुळे मनपाच्या सर्वाधिक आपली बस या स्थानकातून निघते. मनपाच्या परिवहन विभागाकडे या फलाट व स्थानकाच्या देखभालीची जबाबदारी आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, देखरेखीकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन वर्षापासून देखभाल व दुरूस्तीच्या नावावर काहीही करण्यात आले नाही.

फलाटांची छते उडाली
मनपाने तयार केलेली फलाटांची योग्यपध्दतीने देखभाल करण्यात न आल्याने जवळपास सर्वच फलाटांवरील छते उडाली आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते आहे. मोरभवनात असलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नाही. बस संचालन तर होत आहे, परंतु मोरभवनच्या प्रवेशद्वारापासूनन आतमध्ये खड्डयांचेच साम्राज्य आहे. येथील बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना राजस्थानातील उंटामधून प्रवास करीत असल्याचा भास होतो.