हळुवार मनाच्या एका कर्तव्यकठोर जीवनाची इतिश्री..
चारच दिवसांपूर्वी नागपूर-महाल कार्यालयात रवीजींच्या भेटीस गेलो असता मा. प्रभाकरराव, प्रकृती अस्वास्थामुळे खापरीच्या विवेकानंद रुग्णालयात भरती असल्याचे समजले. त्यांची तब्येत काहीशी चिंताजनक असल्याचे मा. बालजींच्या (त्रिपाठी) बोलण्यावरून जाणवले. काही करमेना. खापरीचा दवाखाना गाठला. प्रभाकरराव ICU होते. विशेष म्हणजे ओळखून त्यांनी स्मितहास्य केले. “इथे बिलकुल मन लागत नाही..” असे म्हणतांना त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट जाणवली. गलबलून गेलो. म्हंटलं.. ‘प्रभाकरावांची तब्येत इतकी बिघडल्याची पुसटशी कल्पना देखील आपल्याला नव्हती’.
दवाखान्याच्या बाहेर पडतांना शिरीष वटेंना भेटलो. पायाची जखम व मधुमेह आटोक्यात येत नसल्याने प्रकृती अत्यवस्थ झाली व त्यात ८३ पूर्ण झालेले वय देखील गुंतागुंतीचे ठरत आहे, असे शिरीषजींनी सांगितले. मन अस्वस्थ झाले.. व लगे आजच प्रभाकरावांच्या अंत्येष्टीला नागपूरला जावे लागले. फार विचित्र वाटत आहे. वय झाले होते, पण प्रभाकररावांनी फारच आटोपतं घेतलं.
बालपणापासूनच संघाची आस असलेला स्वयंसेवक
आंबुलकर हे तसे धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील “तळेगांव-दशासर” या खेड्यातील कुटुंब. आई-वडिल, तीर्थरूप गंगुबाई व माधवराव कामानिमित्त पुढे नागपूरला येऊन महालातील फाटे वाड्यात राहू लागले. वासुदेव, रघुनाथ व प्रभाकर, ही तीन मुले आणि कमल एक मुलगी, ही त्यांची चार अपत्ये. मोठे वासुदेवराव एसटीमध्ये नोकरीला. रघुनाथराव लाखनीच्या शाळेत मुख्याध्यापक, तर कमलताईंचा विवाह श्री. बाळासाहेब कोठे यांच्याशी झालेला. या भावंडातील मा. रघुनाथराव यांनी नोकरी करून अविरत संघकार्य केले. चार वर्षांपूर्वी निधन झालेले रघुनाथराव हे अनेक वर्ष विदर्भ प्रांताचे सेवाप्रमुख होते.
बालवयीन प्रभाकरचे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संघाच्या शाखेशी नाते असे काही घट्ट जडले की, त्याचे उर्वरित आयुष्य केवळ “संघमय” होऊन गेले. १९६५ मध्ये मॅट्रिक-डीएड उत्तीर्ण झाल्याझाल्याच प्रभाकरराव प्रचारक म्हणून बाहेर पडले. ओरिसातील केन्दुझर जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक झाली. उत्कल प्रांतात (ओरिसा) संघकार्य रुजविणाऱ्या विभूतींमध्ये प्रभाकररावांचे नाव फार आस्थेने घेतल्या जाते. १९७१ मध्ये आंबुलकर परिवारात काही बिकट प्रसंग आले, परिणामी त्यांना पुन्हा कुटुंबाची वाट धरावी लागली.
महालचे संघ कार्यालय.. हेच घर
१९७१ मध्ये प्रभाकरराव नवयुग विद्यालयात (आताची, पं. बच्छराज व्यास विद्या.) शिक्षक म्हणून रुजू झाले. पण, त्यांचा कायम निवास मात्र महालस्थित “संघ बिल्डींग” हाच असे. तिथपासून तो आजवर, मा. प्रभाकरावांच्या चैतन्यदायी आयुष्याची तब्बल पन्नास वर्षे महाल कार्यालयातील चेतनापूर्ण घडामोडींची साक्ष देतात. महाल कार्यालयातून अंतिम प्रवासाला निघालेला त्यांचा अचेतन देह, त्यांच्या आईचेच नामकरण असलेल्या गंगाबाई घाटावर अंतिमतः विसावला. एवढा प्रदीर्घ काळ, संघ मुख्यालयाच्या कार्यकलापात व्यतीत केलेले मा. प्रभाकरराव, हे एकमेव प्रचारक ठरावेत. याकारणे, मा. प्रभाकररावांचा भारतभरातील कार्यकर्त्यांशी दाट परिचय असे.
दरम्यान, “नागपूर जिल्हा कार्यवाह’ हे दायित्व प्रभाकरावांवर आले. शाळा आटोपली की उर्वरित वेळ केवळ संघासाठीच, हाच दिनक्रम त्यांचा असे. शनि.-रवि. ग्रामीण भागात प्रवास, व कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम..! “मुक्कामी प्रवास” हा त्यांच्या आग्रहाचा विषय राही. पुढे, १९७५ मध्ये देशावर “आणीबाणी” लादल्या गेली.. आणि समस्त भारतातील राजकीय व सामाजिक परिस्थिती अतीव अनिश्चतेची झाली. लाखो लोकं तुरुंगात डांबल्या जात असता, प्रभाकरावांना “भूमिगत” राहण्याचे सांगण्यात आले.
आणीबाणीतील.. “समोसा”
प्रभाकररावांचे राहणे तसे टापटीप असे. धोतर व स्वछ पांढरा सदरा, हा त्यांचा नेहमीच पेहराव. पण, वेषांतर करून चक्क बेलबॉटम-मनिला वा टी-शर्टवर गुप्त बैठका ते घेऊ लागले. कधीकधी तर काळा गॉगल व डोक्यावर कॅप देखील ते चढवत. लपाछपीच्या या आव्हानात्मक काळात त्यांचे नाव होते.. ” सदाशिव मोरेश्वर साने..” अर्थात्, आदरार्थी.. “साने मामा”..! अनेक जण गंमतीने त्यांना “समोसा” म्हणत. अत्यंत बारकाईने त्यांच्या शोधात असलेल्या पोलीस यंत्रणेला प्रभाकरावांनी अनेक प्रसंगात गुंगारा दिला आहे. अशा लंपडावात या समोस्याचा प्रवास कधी रेल्वे इंजिनात होई, तर कधी ट्रकमागील गिट्टी-मुरुमासोबत..!
‘माणूस पारखी’ व क्रियान्वय निपुण
आपल्या राजकीय विरोधकांना अत्यंत कठोरपणे बंदिस्त करणाऱ्या आणीबाणीत ते पोलिसांच्या हाती कधीच लागले नाहीत, याचे गमक म्हणजे, प्रभाकररावांना माणसांची पारख होती. संपर्कात आलेल्या व्यक्तीची स्वभाव-गुणवैशिष्ट्ये अचूकपणे हेरून योग्य पद्धतीत ते संघटनेच्या कामी आणीत. दुसरे असे की, कोणतेही आयोजन वा उपक्रम असो, संघदृष्टिकोनातून ते प्रभावशाली करण्याचे सूत्र त्यांच्यापाशी होते. १९९८ मध्ये खापरीला विदर्भ प्रांताचे महाशिबीर झाले, त्याकाळात प्रभाकरराव हे ‘मा. प्रांत प्रचारक’ होते. त्यांच्या जोडीला मा. विलासजी फडणवीस हे प्रांत कार्यवाह म्हणून असल्यावर ते महाशिबीर भव्यदिव्य व प्रभावशाली न झाले तरच नवल..! महाशिबिरासाठी २५ हजार स्वयंसेवकांचे लक्ष्य ठेवलेले हे विशाल आयोजन उद्दिष्ट ओलांडून ३० हजाराच्या घरात पोहचले. हे शिबीर आखीव व रेखीव होण्याकरीता प्रभाकरराव अहोरात्र झटले. प्रभाकरराव हे एकप्रकारे “टास्क मास्टर” होते, असे म्हणणे वावगे ठरू नये.
…………..
✯ संघ विस्तारासाठी विदर्भ पिंजून काढला ✯
साधारण १९८८-८९ चा काळ असेल. प. पू. डॉ. हेडगेवार जनशताब्दीच्या पावन पर्वाचे नियोजन सुरू होते. मा. आबाजी थत्ते सूचकपणे, पण सहजच विचारते झाले..
_ ‘का रे प्रभाकर, अजूनही नोकरीची निकड आहे कां..?’
झालं.. विषयच संपला..!! प्रभाकररावांनी दुसऱ्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला, व पुनः आबाजींसमोर हजर झाले. त्यांचा संपन्न अनुभव व व्यापक संपर्क पाहता त्यांच्यावर “सह-प्रांत प्रचारक” हे दायित्व आले. त्याकाळात, मा. मोहनजी भागवत हे ‘विदर्भ प्रांत-प्रचारक’ व प्रभाकरराव ‘सह-प्रांत प्रचारक’ या जोडीने पुढे अनेक वर्षे संघविस्तारासाठी अख्खा विदर्भ पिंजून काढली. १९९४ पासून मात्र, प्रभाकररावांनी पूर्णतः ‘प्रांत-प्रचारक’ हीच जवाबदारी सांभाळली. नंतर उतरत्या वयात, २००२ पासून पुन्हा महालात “केंद्रीय कार्यालय प्रमुख” म्हणून काही वर्ष त्यांनी काम पाहिले.. व तद्पश्चात वयानुरूप संघकार्यात ते व्यस्त असत. अखेरच्या वर्षात त्यांनी बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. पण, प्रभाकररावांना भेटण्यास स्नेहीजन आवर्जून येत असत.
स्नेहपूर्ण दरारा
मा. प्रभाकररावांच्या वागण्यात बरेचदा कठोरता दिसे. पण, त्यामध्ये देखील त्यांचे ममत्व असे. मी, अकोला नगर कार्यवाह.. वा पुढे प्रांत कार्यकारिणीत असता, मा. प्रभाकररावांचा दाट स्नेह-सहावास लाभला. बरेचदा ते रागावत, कधी कानउघाडणी देखील करत. पण, त्यांचा शब्द कधी लागला नाही, की मनाला कधी बोचला नाही. मुख्यतः त्यांचे सांगणे असे.._ ‘सारे काम एकट्यानेच अंगावर घेऊन करू नये. एखादे काम थोडे बिघडले तर चालून जाईल, पण सर्वांना सोबत घेऊन काम करता आले पाहिजे. संघटनेचे हे सूत्र स्वतःचा विकास घडवितेच, सोबत नवनवीन नेतृत्व देखील निर्माण करते..!’.
आयुष्यात ‘टीम वर्क’चा धडा काही आत्मसात करता आला असेल, तर तो केवळ प्रभाकररावांच्या शिकवणुकीमुळे..!.
२००७ मध्ये आमचे कुटुंब एका बिकट प्रसंगातून गेले. पत्नी, सौ. गीताचा जीवघेणा अपघात झाला. त्यातून तिला सावरण्यास बराच अवधी लागला. कुटुंब हलले होते.. पण, मा. प्रभाकररावांनी त्या परीक्षेच्या काळात जे नैतिक बळ आम्हाला दिले, ते कधीही विसरता येणार नाही. गीता धोक्याच्या बाहेर आल्यावर डॉक्टरांनी अन्य पॅथीचे उपचार करण्याची अनुमती दिली. प्रभाकरराव स्वतः आम्हाला मा. डॉ. विलास डांगरे यांच्याकडे घेऊन गेले व रीतसर परिचय करून दिला. अधूनमधून फोनवर गीताची खुशाली हमखास ते घेत. गुडीपाडवा व दिवाळीत प्रभाकरराव शुभेच्छा व आशीर्वचनाचा फोन आवर्जून करीत. कार्यकर्त्याप्रती ममत्व, हा प्रभाकररावांचा स्थायीभाव होता.
माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत, सामाजिक व संघजीवन समृद्ध करणाऱ्या..
मा. प्रभाकररावांना हीच शब्दरूपी सुमनांजली..!तेरा वैभव अमर रहे माँ,
हम दिन चार रहें ना रहें॥