इतकेही कोडगे नका होऊ !

0

-पुरुषोत्तम आवारे पाटील

गेल्या दोन दिवसात केवळ विदर्भातच नव्हे तर देशभरात थंडी वाढली आहे. जणू शेजारच्या गावात बर्फवृष्टी होत आहे अशी थंडीची लाट सध्या आपण अनुभवत आहोत. दिवसभर स्वेटर घालून गावभर मिरविण्याची हौस या थंडीच्या लाटेत भागवली जात आहे. राती घरातही एकापेक्षा अधिक उबदार ब्लॅंकेट अंगावर घेण्याची वेळ येऊनही हुडहुडी अंगातून जात नाही. अशावेळी ज्यांच्या वाट्याला रस्त्यावर रात्र काढणे आले आहे अशा लोकांच्या वेदनेशी काही प्रतिशत तरी सहमत होऊन आपण माणुसकीचा परिचय दिला असेल तर आपण जिवंत आहात याची खात्री पटते. अशा सर्व सहृदय लोकांच्या जिवंतपणाला सलाम करायला हवा. गाव असो की शहर आपल्यातली माणुसकी कमीजास्त होत असेल तर कोडगेपणाचा व्हायरस आपल्यात शिरून प्रभावी झालाय असे समजायला हरकत नाही. त्याने संपूर्ण शरीर अन मेंदूचा ताबा घेण्याच्या अगोदर आपणच ताळ्यावर येण्याची गरज आहे.


तुम्ही नोकरदार,व्यावसायिक किंवा मजूर काहीही असा दिवसभरात सभोवताली असे असंख्य लोक दिसतात की त्यांना विविध प्रकारची गरज आहे. आपण मात्र स्वतःच्या गुंताऱ्यात एवढे अडकून पडलो असतो की खरी गरज आपल्याला आहे की त्या रस्त्यावरील व्यक्तीला ? असा अनेकदा प्रश्न पडतो. रस्त्यावर दिसणारे सगळेच काही भिकारी नसतात. अनेक गरजवंत सुद्धा असतात. वृद्ध,आजारी,अनाथ किंवा विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्ती दिसतात त्यात अनेकदा लहान आणि तान्ही बालके सुद्धा असतात. भिकारी वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. कुणी धडधाकट व्यक्ती काहीही मागताना दिसला की त्याचा राग येणे मानवी प्रवृत्ती आहे मात्र वृद्ध,असहाय्य आणि बालकांना तो न्याय लावता येणार नाही. मोठ्या शहरात बालकांच्या किंवा अपंगाच्या आडून भिकेचाही मोठा व्यवसाय चालतो हे वास्तव मान्य करूनही आपल्यात करुणेचा स्थर किती जिवंत असतो हे महत्वाचे आहे.


या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर,पुलाखाली किंवा उघड्यावर एखादी चादर ओढून कुणी मायलेक पोटाशी पाय घेऊन झोपण्याचा प्रयत्न करीत असताना बघणे सुद्धा भयंकर वेदना देणारे असते. त्यांना बघितल्यावर अवघ्या काही मिनिटात आपण घरी जाऊन उबदार बिछान्यात शिरतो तेव्हा तुम्हाला बिनधास्त झोप लागत असेल तर हमखास समजून जावे की संवेदना हरवत आहेत किंवा त्या बधिर तरी झाल्या आहेत. थंडीची चाहूल लागली तरी पोटच्या पोरांना स्वेटर. मफलर ,हातमोजे घालून जाण्याची काळजी लागते. घरात असंख्य प्रकारच्या क्रीम येऊन पडतात. ओठ उलु नयेत,टाचांना भेगा पडू नयेत किंवा त्वचा कोरडी पडू नये यासाठी महागड्या कोल्डक्रीम घरात भरण्याच्या काळात आपल्या मुलांच्याही कमी वयाची मुले जेव्हा उघड्यावर झोपलेली दिसतात तेव्हा घरातल्या या वस्तू कचऱ्यात फेकण्याचा लायकीच्या वाटतात.


अशा मुलांमध्ये जबरदस्त इम्युनिटी तयार होते असे बिनडोक समर्थन करीत आपले दायित्व भलेही कुणी विसरत असेल परंतु त्यामुळे अशा मुलांना जे सोसावे लागते ते चुकत नाही. त्यावर फार डोकेफोड करीत बसल्यापेक्षा शेसव्वाशे रुपयांचे एखादे नवे किंवा घरातील जुने ब्लँकेट आणून त्यांच्या अंगावर टाकले पाहिजे. खरंतर हे सांगण्याची वेळ येणे हेच मुळात आपल्या सगळ्यांच्या संवेदना झपाट्याने बोधट, बधीर होत असल्याचे लक्षण आहे असे मानावे लागेल. आपल्या घरात जुने उबदार कपडे,ब्लँकेट भरपूर असतात ,लहान मुलांचे कपडे सुद्धा असतात अशावेळी गरजवंतांना ते उपलब्ध व्हायला हवेत तरच माणुसकी उबदार राहील अन्यथा ती सुद्धा थंडीत कुडकुडल्याशिवाय राहणार नाही. अनेक मतिमंद स्त्रियांवर आपल्यापैकी कुणीतरी हैवानाने मातृत्व लादले असते या घटना आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेले भोग कसे असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही.


ज्या ऋतूत अनेक प्रकारची काळजी करीत आपले मासिक बजेट वाढत असते त्याच ऋतूत रस्त्यावरचे जगणे उघड्या डोळ्यांनी बघताना अलीकडे बहुतांश लोकांना पाझर फुटणे बंद झाले आहे. रस्त्यावर चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या अनोळखी व्यक्तीकडे कदाचित दारुडा असावा हे तत्वज्ञान वापरत आपण दुर्लक्ष करण्याची शक्कल शोधून काढली आहे तिने अनेक ठिकाणी मानवतेला काळिमा फासला आहे. अश्या घटनेत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहेत. असंख्य रोगांचे माहेरघर बनलेले शरीर घेऊन आपण वावरतोय त्यामुळे असे प्रसंग आपल्यावर सुद्धा येऊ शकतात याची जाणीव ठेवून आपल्या जगण्याचा दगडी मार्ग थोडासा मऊ होऊशकला तर त्यातून अनेकांची आयुष्य अधिक वाढीस लागतील ,नव्या वर्षात त्याची सुरुवात प्रत्येकाने जमेल तशी करायला हरकत नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा