
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
प्रतिनिधी|नागपूर
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डाॅक्टरांनी (डॉ. संपदा मुंडे) एका लाॅजच्या खोलीत आत्महत्या केली. या प्रकरणांत आतापर्यत पोलिस निरीक्षक गोपाल बदने व पोलीस प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीं व्यतिरिक्त कोणी आहे काय या अंगाने तपास करण्यासाठीच न्यायाधीशामार्फत चौकशी सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तरावर झालेल्या चर्चेत दिली.
मृत डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली. संपदा मुंडे यांनी हातावर लिहीलेली सुसाईड नोट त्यांच्या स्वत:च्या अक्षरात लिहीलेली आहे, पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने फसवणूक करून त्यांचे शारीरिक शाेषण केले हे तपासात स्पष्ट झाले आहे. अनेक अटकेच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी फिटनेसचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. मुंडे यांनी ते अनफिटचे दिल्याचे समोर आले आहे असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अमित साटम यांनी संपदा मुंडे खून प्रकरणाचा तपास किती दिवसात होईल असा प्रश्न उपस्थित केला.
संपदा मुंडे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. महिलांच्या प्रकरणात ९० ऐवजी ६० दिवसात आरोपपत्र सादर करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र लवकरच दाखल होईल. महिला आयपीएस अधिकारी चौकशी करीत अाहे.
विजय वडेट्टीवार यांनी महिला डाॅक्टरवर अनफिटचे प्रमाणपत्र टाकण्यासाठी दबाव टाकल्या जात हाेता असा आरोप केला. त्यावर या प्रकरणी डिजिटल आणि फारेन्सिक पुरावा आहे. महिला डाॅक्टर मुंडे त्यांच्या खाेलीत जातपर्यतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रकाश सोळंके यांनी कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देईल काय असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महिला डाॅक्टर ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने नोकरीला होत्या. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येणार नाही. मात्र मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू असे गृहमंत्र्यांनी सांगितले. ज्योती गायकवाड यांनी मकोका लावणार काय, महिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक आणणार काय? असे प्रश्न उपस्थित केले.
लाडक्या बहिण योजनेशी सर्व गोष्टी जोडू नका
लाडकी बहिण याेजनेत मिळणाऱ्या १५०० पेक्षा सुरक्षा महत्वाची आहे, असे गायकवाड म्हणाल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सगळ्या पद्धतीने चौकशी केली जात आहे. काहींनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून एखाद्याला टारगेट करणे चांगले नाही असे सांगितले. तसेच सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिण योजनेशी जाेडायच्या हेही चांगले नाही. राज्यातील अडीच कोटी बहीणींनी योजना स्वीकारलेली आहे. त्यामुळे योजनाही सुरू राहिल आणि महिला सुरक्षेचीही काळजी घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सुनील प्रभू यांनी पुणे कोरेगाव येथे राहाणाऱ्या मुलीला मारल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधले. याही प्रकरणाची निश्चित चौकशी केली जाईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. नाना पटोले यांनी कोणालाही यावर राजकारण करायचे नाही, असे स्पष्ट केले. राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना घडत आहे. या घटनांना आळा लावण्यासाठी शक्ती कायदा आणला होता. त्याचे काय झाले तसेच निराधार योजनेचे पैसे देण्यात आले नाही असा आरोप केला.
निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही. आता थेट बँक खात्यात जमा होतात. केवायसी झाल्या नंतर निराधारचे उर्वरीत पैसे महिन्याच्या १ तारखेला जमा होतील. शक्ती कायदा परत आला आहे. संविधानाने आपल्याला देणाऱ्या अधिकाराचा अधीक्षेप करणारा असल्यामुळे शक्ती कायदा परत पाठवला आहे. त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येईल असे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



















