
नागपूर : मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलिस ठेवून चर्चेत आलेल्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. केसरकर यांच्या घरासमोर त्याने उपोषणही केले होते. या संबंधीची लक्षवेधी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, विकास ठाकरे, अमिन पटेल, अस्लम शेख, डाॅ. ज्योती गायकवाड आदींनी उपस्थित केली होती.
या लक्षवेधीवरील प्रश्नाच्या उत्तरात बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आॅडिशनच्या नावाखाली ७ आणि १४ वर्षाची २० मुलामुलींना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी समयसुचकता बाळगून आर्याला ठार केले. बॅलस्टिक रिपोर्टमध्ये गनमध्ये गोळ्या होत्या हे स्पष्ट झाले आहे असे सांगितले.
कमरेच्या खाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट मारण्यात आली?, एन्काउंटरसाठी वाघमारे यांनाच का आणण्यात आले?, आर्याने नाव घेतलेल्या मंत्र्यांची चौकशी झाली काय?, आर्याची देयके सरकारकडे बाकी आहे की नाही? असे अनेक सवाल वडेट्टीवार यांनी केले.
सल्लागार असलेल्या आर्याने सीएसआरच्या माध्यमातून प्रकल्प आणला होता. त्याने परवानगी नसताना शाळांकडून पैसे गोळा केले. ते पैसे परत करण्यासाठी आर्याला नोटीसही देण्यात आली होती असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. सीएसआर अंतर्गत केलेल्या दोन टप्प्यांचे ९ लाख ९० हजाराचे पेमेंट करण्यात आले आहे. या प्रकरणांत आतापर्यत ११५ जणांचे बयाण घेण्यात आले आहे.
नाना पटोले, दिलीप लांडे यांनीही प्रश्न उपस्थित केले. ठेकेदाराचे पैसे थकत होते. पण, सल्लागाराचेही पैसे थकले हा नवा प्रकार समोर आला. हे प्रकरण हाताळण्यात सरकार दोषी आहे असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला. सखोल चौकशी करून अधिवेशनात अहवाल ठेवावा असे पाटील म्हणाले.















