Home MAHARASHTRA राज्यातील बिबट वन्यजीव प्रश्नावर विधानसभेत घमासान चर्चा

राज्यातील बिबट वन्यजीव प्रश्नावर विधानसभेत घमासान चर्चा

0

उपाय योजना करण्यासाठी अधिवेशन काळात महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसाेबत लोकप्रतिनिधींची चर्चा करणार असल्याची बावनकुळे यांची घोषणा

प्रतिनिधी|नागपूर
राज्याच्या विविध भागात बिबट्यांची दहशत वाढलेली असून बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नाशिक, जुन्नरसह सर्वच ठिकाणी लोक बळी गेले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी अधिवेशनाच्या पाच दिवसात महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बिबट्याचा उपद्रव असलेल्या भागातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात दिली.
बिबट्यांचा उपद्रव असलेल्या प्रत्येक भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे समस्या नीट समजून घेऊन उपाय योजना करण्यासाठी महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ असे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्याच्या विविध भागात बिबट्याची दहशत वाढलेली असून बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची लक्षवेधी मोहन मते, सुनील प्रभू, अमित साटम, ज्ञानेश्वर कटके, राेहित पवार, दौलत दरोडा, प्रतापराव पाटील चिखलीकर आदींनी मांडली होती. अतुल भातखळकर, सुदर्शन नरके, जयंत पाटील, नाना पटोले, शरद सोनावणे, अब्दुल सत्तार आदींनी चर्चेत भाग घेतला.
या लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलातील लहान प्राण्यांची संख्या कमी झाल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही. त्यामुळे शहरी वस्तीतील हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून बिबट्यांचे खाद्य ठरतात, अशा काही शेळ्या जंगल परिसरात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता नसबंदीला परवानगी दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर, रेस्क्यू सेंटरमधील ११५ बिबट्यांवर हे प्रयोग केले जाणार आहेत. यापैकी पाच बिबट्यांवर पहिल्या टप्प्यात प्रयोग करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
या शिवाय मानवी वस्तीत येणारे व मानवी बळी घेणाऱ्या बिबट्यांना नरभक्षक घोषीत करण्याचे निर्देश दिले आहे, असे सांगितले. पुणे, अहिल्या नगर व नाशिक जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता तीनही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६०० बिबटे ठेवण्याची क्षमता असलेले रेस्क्यू सेंटर किंवा ट्रान्झिट ट्रिटमेंटर सेंटर सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.
लक्षवेधीला दिलेल्या लेखी उत्तरात डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत बिबट प्रवण क्षेत्रातील राहती घरे, गोठे व तत्सम इमारती सभोवताली सौर कुंपण उभारण्याकरीता १०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे असे नमूद केले होते. चंद्रपूर येथील मानव वन्यजीव संघर्ष रोखण्याकरीता वापरण्यात आलेली कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित एआय पूर्वसूचना देणारी यंत्रणा राज्यातील बिबट प्रवण क्षेत्रामध्ये वापरण्यात येईल. जुन्नर वनविभागात बिबट्यांना जेरबंद करण्याकरीता १००० पिंजरे खरेदीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तत्काळ कार्यवाहीसाठी जलद बचाव पथक, प्राथमिक बचाव दल स्थापन करण्यात आले आहे. मानव वन्यजीव संघर्षाची स्थिती हाताळण्याकरीता एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे.
पुुणे, अहिल्या नगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबटे वाढलेले आहे. हे आता वन्यजीव नव्हे तर उसातील जीव झाले आहे. बिबट शेड्यूल-१ मध्ये आहे. त्यांना शेड्यूल-२ मध्ये आणायचे आहे. त्यांचे प्रजनन कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे त्यांच्यासाठी शिकारही राहिलेली नाही. त्यामुळे जंगलात शेळ्या सोडण्यात येईल. मागणी केली जाईल त्या त्या ठिकाणी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येतील अशी घोषणाही वनमंत्र्यांनी केली.