दौरा रद्द करण्याची पाळी

0

औरंगाबाद: चक्क विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही आज आपला औरंगाबाद दौरा रद्द करावा लागला. विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री तासभर विमानतळावर थांबले होते. मात्र, दुरूस्ती शक्य न झाल्याने अखेर त्यांनी औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हजेरी लावणार होते. मात्र, विमानातील बिघाडामुळे त्यांना दौराच रद्द करावा लागला आहे.
औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी येथे 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान उद्योजकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे ‘ऑनलाइन उद्घाटन’ होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण आठ मंत्री हजेरी लावणार होते. मात्र मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबई विमानतळावर पोहचल्यावर त्यांच्या विमानाच्या जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. तासभर प्रयत्न करून देखील यात दुरूस्ती होऊ न शकल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. तर दोन्ही नेते मुंबई विमानतळावरून पुन्हा परत निघून गेले. दरम्यान, आता या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना व्हर्च्युअल उपस्थिती लावावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.