कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीत आग, ३ कामगारांचा मृत्यू ,तीन जखमी

0

 

नागपूर – हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत लागलेल्या आगीत ३ कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. स्फोटानंतर आग लागल्यासह या आगीची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.या दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांमध्ये हेमराज आर्मो, आदेश दहीवाले आणि अनिरूद्ध मडावी यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये धनेंद्रा आगासे, विकास मडावी आणि सरीत मडावी यांचा समावेश आहे. 10 अग्निशमन गाड्यांची मदत आग विझविण्यासाठी झाली.

शेतातील तणकट आणि धसकटापासून पॅलेट तसेच वीटा तयार करण्याचा हा कारखाना आहे. यात तयार माल कोंबून भरण्यात आला हाेता. कारखान्यात असलेली आग विझवण्याची उपकरणे बंद होती असे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. आमदार समीर मेघे यांनी घटनास्थळी भेट देत कंपनी व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली. कंपनीने अनेक बाबींचे उल्लंघन केल्याचा आरोप मेघे यांनी केला. या शिवाय सोनेगाव निपाणी ग्रामपंचायतकडून एनओसी घेण्यात आली नव्हती असे कळते.

या घटनेत जखमी झालेल्या तीन कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत.