Home political ओबीसी आंदोलकांसोबत 29 रोजी बैठक

ओबीसी आंदोलकांसोबत 29 रोजी बैठक

0

नागपूर : ओबीसी आंदोलकांशी येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्य सरकार व ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीचे निमंत्रण नागपुरात सुरू असलेल्या संविधान चौक येथील ओबीसी आंदोलनस्थळी लवकरच आमदार परिणय फुके घेऊन पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान राज्य सरकारकडून मराठ्यांना कुणबी सरसकट प्रमाणपत्र व त्यांचे ओबीसीकरण होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ओबीसी महासंघाचे नेते,अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता ओबीसी आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजेच त्यांचे ओबीसीकरण करणे आहे. आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही ,असा सज्जड इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी यापूर्वीच दिला आहे. नागपुरातील संविधान चौकात गेल्या 13 दिवसांपासून ओबीसी समाजाचे, विविध संघटनांचे आंदोलन सुरू असून 12 दिवसापासून चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. याकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही. मराठा समाजाच्या उपोषणाची, आंदोलनाची तातडीने दखल घेण्यात आली. मात्र,ओबीसी समाजाला दुर्लक्षित केले जात आहे असा आरोप डॉ तायवाडे यांनी केला.