विदर्भात मान्सून लांबला,पण पेरणीची घाई नकोच !

0

 

नागपूर : बिपरजॉय वादळामुळे हवामान विभागाचा पावसाचा अंदाज यावेळीही चुकला असून विदर्भात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. आता पुन्हा वातावरण बदलत असले तरी जुलै पहिल्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस येईल असा अंदाज आहे . कृषी अधिकारी, कृषी तज्ञांच्या मते शेतकऱ्यांनो घाई करू नका, मान्सून लांबला असला तरी पेरणीची वेळ अद्याप गेलेली नाही. दुबार,तिबार पेरणीचा धोका ओढवून घेऊ नका. अति घाई संकटात नेई.. असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होतो मात्र बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून खरीप पेरणीचे नियोजन बिघडले आहे.
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, कृषी तज्ञ डॉ शरद निंबाळकर यांनी सांगितले गेल्या अनेक वर्षात तो 15 जूनच्या पुढे पाऊस येत आहे. किमान 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. यंदा दीर्घकालीन पिके टाळावीत,कापूस, धान, सोयाबीन, तूर,ज्वारी या सर्वच पिकांची पेरणी करताना 20 टक्के बियाणे अधिक वापरावे, दीर्घकालीन नव्हे तर कमी कालावधीत येणारी बियाणे वापरावी, दोन ओळी मधले अंतर कमी करावे, सहा ओळी कापूस एक ज्वारी दोन ओळी तूर एक ओळ कापूस आणि पुन्हा सहा ओळी कापूस अशा पद्धतीने आंतरपिके घ्यावीत. जेणेकरून एका पिकाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकातून भरून निघू शकेल यावर त्यांनी भर दिला.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात 20.30 लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून आतापर्यंत 0.03 इतकी पेरणी झाली तर अमरावती विभागात 32. 59 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असून 0.0 2% पेरणी झाली. यातही धुळपेरणी अधिक आहे. स्कायमेट आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार सहा जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस विदर्भात पडेल मात्र हा अंदाज देखील चुकल्यास दुष्काळाची भीती आहे.
दरम्यान, विभागीय कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे म्हणाले पाऊस जरी लांबला असला तरी अद्याप पेरणीची वेळ गेलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई करण्याची गरज नाही आपल्याकडे 25 जून पर्यंत पेरणी करता येते. किमान शंभर किलोमीटर पाऊस जमिनीत सहा इंच पर्यंत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये खरीप हंगामाच्या दृष्टीने विभागातील सहा जिल्ह्यात 19.50 लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.