(MP Udayanraje Bhosale on Jagdamba Sword)ब्रिटीश सरकारने मोठ्या मनाने जगदंबा तलवार परत करावी-उदयनराजे भोसले

0

साताराः इंग्लंडमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. अशातच खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale on Jagdamba Sword) यांनीही या मुद्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदयनराजे म्हणाले की, जगभरातील लोकांच्या भावना शिवरायांच्या ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ तलवारींशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे ती तलवार भारतात यावी, असे प्रत्येकालाच वाटते. सध्या इंग्लंडमध्ये ती जेथे ठेवली आहे, तेथे प्रचंड सुरक्षा आहे. आपण स्वतः ती तलवार तेथे पाहिलेली आहे. ब्रिटीश सरकारने ती तलवार मोठ्या मनाने परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसलेयांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असेलल्या अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराजांचे विचार पाहिले तर त्यांनी नेहमीच प्रत्येकाचा सन्मान केला. त्यांच्यावर हल्ला करायला आलेल्या माणसालाही त्यांनी तेथे जागा दिली. इतका मोठा विचार आपण कोणीच करू शकलो नसतो. पण त्यांनी तो केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधली. आज त्याला एवढे वर्ष लोटून गेले आहेत. तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवला पाहिजे. त्याठिकाणी जे अनधिकृत बांधकाम झाले आहे, ते वनविभागाच्या जागेवर आहे. ते एकप्रकारे अतिक्रमण होते. त्यामुळेच राज्य शासनाने ते अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली आहे. त्याला कुठलाही धार्मिक रंग देऊ नये, असेही उदयनराजे म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा