ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर – उपमुख्यमंत्री

0

 

 

मुंबई, 6 जून,  – राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच टोरंट पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान अनुक्रमे रू. 44,000 कोटी व रु. 27,000 कोटी इतक्या रकमेचे सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय कुमार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांव्दारे राज्यातील शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील विजेची वाढती मागणी भागवता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पांत हरित आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) राज्यात 7,350 मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील सावित्री (2250मेगावॅट), काळू (1150 मेगावॅट), केंगाडी (1550 मेगावॅट) व जालोंद (2400 मेगावॅट) या 4 ठिकाणी ऑन स्ट्रिम (On-stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी ही ठिकाणे या कंपनीस वाटप केली आहेत.

मे. टोरंट पॉवर लि. कंपनी कर्जत (3000 MW), मावळ (1200 MW), जुन्नर (1500 MW) या तीन ठिकाणी एकूण 5700 MW क्षमतेचे ऑफ स्ट्रिम (Off Stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसीत करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे रु. 27,000 कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात 13,050 मेगावॉट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार असून याव्दारे एकूण ₹71,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ग्रीड बॅलन्सिंग, पीक डिमांड पूर्ण करणे, ब्लॅक स्टार्ट इत्यादी बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी होईल. याव्दारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधीही वाढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उदंचन जलविद्युत प्रकल्प तंत्रज्ञान

उदंचन जलविद्युत प्रकल्प (Pumped Storage Projects) नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेजप्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे Lower Reservoir मधून Upper Reservoir मध्ये पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर हायड्रोइलेक्ट्रिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो. उदंचन जलविद्युत प्रकल्प हे गेल्या शतकभरामधील सिद्ध ठरलेले तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रदूषण जवळपास होत नाही, त्याचबरोबर केवळ अल्प साठवणूक क्षमतेच्या निम्न व ऊर्ध्व जलाशयामुळे मानवी वस्तीचे संपादन, पुनर्वसनचे प्रश्नही उद्भवत नाही. या तंत्रज्ञानालाच ‘नैसर्गिक बॅटरी’ असेही संबोधण्यात येते.

बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम दीर्घकाळ टिकाऊ ठरत नाही; तर, उदंचन संच प्रकल्प दीर्घकाळ टिकाऊ ठरतात. त्यामुळे उदंचन संच प्रकल्प जास्त व्यवहार्य ठरतो. देशात व महाराष्ट्रात ती क्षमता केवळ पश्चिम घाटाच्या परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचे मुख्य कारण पश्चिम घाटांमधील अनुकूल अशी सह्याद्रीच्या पर्वत रांगांची प्राकृतिक रचना होय.