नागपूर : “कर्नाटकच्या मंत्र्यांचे मुंबईवर दावा करणारे वक्तव्य चिथावणीखोर करून त्याचा आम्ही निषेध करतो. मुंबई कोणाच्या बापाची नाही व मुंबईवरील दावा करणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही निषेधाचे पत्र कर्नाटकला पाठवणार आहोत. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असून शहा यांनी त्यांना तंबी द्यावी, अशी विनंतीही आम्ही त्यांना करणार आहोत. मुंबई ही महाराष्ट्राचीच असून तिच्यावरील दावा खपवून घेतला जाणार नाही”.. या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी कर्नाटकच्या चिथावणीखोर मंत्र्यांना व तेथील सरकारला सुनावले. यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांकडे लक्ष वेधले होते. मुंबई केंद्रशासित करा किंवा मुंबई ही कर्नाटकची असल्याचे दावे मंत्र्यांकडून सुरु असल्याची माहिती पवार यांनी दिली. सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सातत्याने सुरु आहेत. या दोन्ही वक्तव्यांचा राज्य सरकारने निषेध नोंदवावा, या वक्तव्यांची माहिती केंद्रापर्यंत पोहोचवावी, याबद्धल पत्र लिहून तीव्र नाराजी कळवावी, अशी मागणीही पवार यांनी केली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
फडणवीस म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी नव्याने दावे केले जाणार नाही, असे ठरले होते. कर्नाटकच्या मंत्र्यांनी, आमदारांनी किंवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेले दावे त्या बैठकीच्या निर्णयाशी विसंगत आहे. मुंबईवर दावा करणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही निषेधाचे पत्र कर्नाटकला पाठवणार आहोत. दोन राज्यांच्या संबंधासाठी हे योग्य नाही. ही बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. शहा यांनी त्यांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंती आम्ही करणार आहोत. मुंबई ही महाराष्ट्राचीच असून ती कुणाच्या बापाची नाही. मुंबईवरील दावा मुळीच खपवून घेतला जाणार नाही.”