नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ डिसेंबरच्या नागपूर दौऱ्यात ते नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी (PM Modi to travel in Metro) सांगितले. ही शक्यता लक्षात घेऊन महामेट्रोच्या वतीने जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी हे खापरी ते झिरो माईल असा वर्धा मार्गावरील प्रवास मेट्रोतून करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय डॉ. ब्रजेश दिक्षित यांना विचारणा केली असता त्यांनी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. वर्धा मार्गावरील डबल डेकर पूल नटविण्यात येत पंतप्रधानांच्या मेट्रो सफारीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा मिहानमधील एम्स रुग्णालयाच्या मागील भागात होणार आहे. येथून जवळच खापरी मेट्रो स्टेशन आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते झिरो माईलपर्यंत मोदी मेट्रोतून प्रवास करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महामेट्रोचीही त्या दिशेने तयारी सुरु आहे. वर्धा मार्गावरील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या डबर डेकर पुलाचे डांबरीकरण, येथील दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कापणी आदी कामे करण्यात येत आहे. मोदी मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गाचेही लोकार्पण करण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यावरून महामेट्रो प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्धा मार्गावरील ट्रॅक, स्टेशनची स्वच्छता आदी करण्यात येत आहे. नागपुरातही अनेक भागात साफसफाई सुरु आहे. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर चकाचक होत आहे.