नायलॉन मांजाने मुलीचा कापला गळा

0

नागपुरातील घटना- गळ्याला 26 टाके

नागपूर. प्रतिबंधित असूनही शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जात आहे. पतंगशौकीनांचा हा बेदरकारपणा साऱ्यांसाठीच धोक्याचा ठरला आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे एका 5 वर्षीय मुलीचा गळा कापला गेल्याची घटना शुक्रवारी नागपुरातील फारूकनगर भागात घडली. या घटनेत मुलगी बचावली असून, तिला तब्बल 26 टाके पडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे प्राणघातक नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरासमोरच रस्त्यावर खेळत असताना तिचा नॉयलॉन मांजाने गळा कापला गेला आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांजाल्या बंदी असताना सुद्धा शहरात पंतगं विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. आता यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


मांज्याची सर्रास विक्री


संक्राती जवळ आली असून मांजा आणि पतंग विक्रीचा बाजार सजला आहे. सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. दुकानासमोर दुसरा मांजा विक्रीला ठेवला जातो. ग्राहकाने इशारा केल्यास हवा तेवढा नायलॉन मांजा मागच्या दाराने उपलब्ध करून दिला जात आहे. या मांजाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.


पक्ष्यांवर उपचाराची विशेष सोय


प्रतिबंधित नायलॉनच्या मांज्याने पतंग उडवल्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी जखमी होतात तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो. जखमी पक्ष्यांना वाचवण्यासाठी सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत आहे. मकर संक्रांती दरम्यान दररोज सुमारे 40 ते 50 जखमी पक्षी येथे येत असल्याचे टीटीसीचे डॉक्टर सांगतात. यातील बहुतेक पक्ष्यांची मान आणि पंख कापलेले असतात. यामुळे त्वरित उपचाराची आवश्यकता असते. या हंगामात सुमारे 1 हजार जखमी पक्षी येण्याची शक्यता असून, ते टीटीसीमध्ये ठेवणे शक्य नाही. त्यामुळे उपचार केंद्राबाहेर स्वतंत्र तात्पुरता कक्ष तयार करून पक्षी ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. पुढील आठवड्यात हा सेल तयार होईल. दुसरीकडे, संक्रांतीच्या सणाच्या दिवशी घराबाहेर पडताना काळजी घ्या, असा सल्लाही वन्यजीवप्रेमींनी दिला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा