काँग्रेस कुणाच्या पाठीशी ? वडेट्टीवारांकडे बैठक,झाडेसाठी कपिल पाटील मैदानात!

0

नागपूर (nagpur) : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे गंगाधर नाकाडे  (gangadhar nakade) यांना माघार घ्यावी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार  (satish itkewar)  यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करण्यात आले असताना काँग्रेस नेमके कुणाला समर्थन देणार याविषयीचा तिढा सोडविण्यासाठी आज माजी मंत्री विजय वडेट्टीवार  (vijay wadettiwar) यांच्याकडे माजी मंत्री सुनील केदार आणि इतर नेत्यांची बैठक झाली. आतापर्यंत विविध बैठकांमधून सर्वानुमते पक्ष अडबले यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यानिमित्ताने विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी आदेश देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली यामुळे समर्थनाचा प्रश्नच नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या पाठिशी उभी असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर् पेठे यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे पदवीधर निवडणुकीत मदत करा आम्ही तुम्हाला शिक्षक मतदारसंघात मदत करू असा शब्द देऊनही काँग्रेसने तो पाळला नसल्याची नाराजी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी बोलून दाखविली. झाडे यांच्यासाठी शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील स्वतः नागपुरात मैदानात उतरल्याने ही लढत रंगतदार झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांच्यासाठी भाजपची शिक्षक आघाडी नाराजी पचवून कितपत काम करणार यावर सारी गणिते अवलंबून असणार आहेत. आता या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत. एकाने माघार घेतली असली तरी तिघे मैदानात कायम असल्याने मविआचे मतविभाजनात फायदा भाजपलाच होणार हे उघड आहे.