नवेगाव प्रकल्पात दोन नव्या पाहुण्याचे आगमन
अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण
गोंदिया, दि. २०:- संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रम्हपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. रामगावकर, विशेष पोलीस महासंचालक संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा जयरामेगौडा आर., निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.
जगात चौदा देशात वाघांचा अधिवास आहे. वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतात व त्यातही महाराष्ट्र विदर्भात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते २०१९ च्या गणनेत ते ३१२ झाले आणि आता ५०० च्या वर वाघांची संख्या आहे. यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. याचाच अर्थ विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले आहे असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ११ टायगर असून वीस वाघ अधिवास क्षमता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.
पुढील टप्प्यात तीन वाघांचे स्थानांतरण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक ४०० युवकांना प्रशिक्षण तसेच शंभर वाघमित्र नेमले आहेत. वाघमित्रांना दोन हजार रुपये सन्माननिधी देण्यात येत येतो. तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सहा वाहने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सारस संवर्धनासाठी ६२ कोटींचा आराखडा बनविण्याच्या न्यायालयाच्या सुचना आहेत त्यावर काम सुरू असल्याचे मंत्री म्हणाले.
पाच वाघांचे स्थानांतरण गेली दहा महिने वन विभाग या विषयावर काम करत होते. माळढोक व गिधाड पक्षी संवर्धन सुद्धा गरजेचे असून त्यासाठी वनविभाग आराखडा बनवित असल्याचे त्यांनी सांगितले. चिमण्या आता कमी दिसतात. येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ कथा कवितेतूनच समजू नये म्हणून चिमण्यांचे संवर्धन आवश्यक आहे असे ते म्हणाले. कुरण विकास करणे व पाणवठे वाढविणे यावरही काम सुरू आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात स्थित असून 2013 मध्ये अधिसूचित करण्यात आलेला हा व्याघ्र प्रकल्प आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा देशातील 46 वा व राज्यातील 5 वा व्याघ्र प्रकल्प असून प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापना करण्यात आलेला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे गाभा क्षेत्र 656.36 चौ.कि.मी. आहे तसेच 1241.24 चौ. कि.मी. बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. ऑल इंडिया टायगर ईस्टिमेशन 2022 च्या अहवाल नुसार नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रा मधे किमान 11 प्रौढ वाघ असल्याचे नमूद आहे. सध्यस्थितीत व्याघ्र क्षेत्र हा कमी व्याघ्र घनतेचा भूभाग असून, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात 20 प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे.
वाघांचे संवर्धन व स्थानांतर (Conservation Translocation of Tigers) या उपक्रमा अंतर्गत एकूण 4-5 मादी वाघिणींना ब्रह्मपुरी भूभागातून नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात 2 मादी वाघिणीचे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे आज स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा भागात सोडण्यात आले. वाघिणींना सोडल्या नंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या सहाय्याने दोन्ही वाघिणींचे 24 x 7 सक्रियपणे सनियंत्रण केले
जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार आहे. या दोन स्थलांतरित वाघिणींच्या निरीक्षणानंतर व उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्याटप्प्याने स्थानांतरीत केले जाईल.
या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ राखीव क्षेत्रात भविष्यात वाघाच्या संखेत वाढ होवून प्रकल्पात पर्यटनाला चालना मिळू शकते. स्थानिकांना उपजीविकेच्या संधी निर्माण होतील तसेच जास्त व्याघ्र संख्या असलेल्या ब्रह्मपुरी भूभागातील मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.