
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस
नागपूर(Nagpur), दि. ६ मे २०२६:
भिडू, लंबी सांस लेने का, खोपडी थंडा रखने का…भानगडी नको, आयुष्य मस्त जगायचं!
अशी सुखी जीवनाची प्रोटीन रेसिपी जगू दादा नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत खेळाडूंना सांगितली.
सेवानंद विद्यालय, कोराडी येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जॅकी श्रॉफ यांनी स्पर्धा स्थळाला भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला.
जॅकी श्रॉफ यांची मैदानावर एन्ट्री होताच वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले. मोबाईल फ्लॅश लाईटने प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी त्यांनी खेळाडूंशी थेट संवाद साधत त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. अहिल्यानगर विरुद्ध ठाणे हा सामना त्यांनी पाहिला.

यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा संचालक पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेला लाभलेली ही स्टार उपस्थिती आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे दुसऱ्या दिवसाचा जल्लोष अधिकच रंगतदार ठरला.

तरुणांनी उत्तम खेळाडू बनावे – नितीन गडकरी
नागपूर जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत असते, तसेच खासदार क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना व्यासपीठ मिळत आहे. अधिकाधिक तरुणांनी उत्तम खेळाडू बनावे आणि त्यांना योग्य संधी मिळावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नितीन गडकरी यांनी स्पर्धा ठिकाणी भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व खेळाडू आणि पाहुण्यांचे नागपूरमध्ये मनःपूर्वक स्वागत करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. नितीन गडकरी यांनी सामने प्रत्यक्ष पाहून खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी आमदार परिणय फुके यांनी आमदार निधीतून ₹१० लाखांची मदत केली.















