Home Artical Blog संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास व वर्तमानावर झाली चर्चा

संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास व वर्तमानावर झाली चर्चा

0

महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त विदर्भ साहित्‍य संघात चर्चासत्र

नागपूर(Nagpur), दि. 2 मे :
विदर्भ साहित्य संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्‍य साधून शुक्रवार 1 मे रोजी ‘संयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात पार पडलेल्‍या या चर्चेत मान्‍यवर वक्‍त्‍यांनी संयुक्‍त महाराष्‍ट्राचा इतिहास व वर्तमान स्थितीवर विस्‍तृतपणे चर्चा केली.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समीक्षक डॉ. वि. स. जोग होते तर ‘दै. तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक सुधीर पाठक, डॉ. प्रदीप आगलावे आणि शरद पाटील प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. मंचावर विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष डॉ. गिरीश गांधी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. नाना जोग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला प्रदेश आहे. येथे मराठी माणसाची एकता केवळ भाषेवर आधारित नसून इतिहास, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांवर उभी आहे. एकता म्हणजे एकसारखेपणा नव्हे, तर समरसता आणि सहिष्णुता होय. मात्र, आजच्या काळात सहिष्णुतेत घट होताना दिसते आहे असे सांगताना शरद पाटील यांनी सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी पुढाकार घेऊन समाजात एकात्मता आणि बंधुभाव वाढवण्याची गरज असल्‍याचे सांगितले.
भाषिक आधारावर राज्यनिर्मितीचा विचार आजही महत्त्वाचा आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली; मात्र भाषा एकटीच सांस्कृतिक एकता निर्माण करू शकते का, हा प्रश्न अद्यापही तितकाच महत्त्वाचा आहे, असे डॉ. प्रदीप आगलावे म्‍हणाले.
सुधीर पाठक यांनी संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना विस्‍तृतपणे सांगितली. विदर्भाच्या दृष्टीने ही प्रक्रिया मिश्र भावना निर्माण करणारी होती. स्वतंत्र ओळख गमावण्याची भीती आणि विकासाबाबतची चिंता होती. मात्र, व्यापक हित लक्षात घेऊन विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला. नागपूरने राजधानीचा दर्जा सोडत राज्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली, असे ते म्‍हणाले.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ. वि. स जोग यांनी आजच्या नव्या पिढीसमोर वेगळे प्रश्न उभे असल्‍याचे सांगत विदर्भ असो वा संयुक्त महाराष्ट्र त्यांच्यासाठी विकास अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी स्वीकारून पुढे जाण्याची गरज आहे, असल्‍याचे प्रतिपादन केले. प्रास्‍ताविकातून डॉ. गिरीश गांधी यांनी विदर्भ साहित्‍य संघाचे मराठी भाषेच्‍या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्‍न प्रतिपादित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. पराग घोंगे यांनी केले.