Home Artical Blog दिल्लीतील विवेक विहारमध्ये भीषण आग; चार मजली इमारतीत दुर्घटना

दिल्लीतील विवेक विहारमध्ये भीषण आग; चार मजली इमारतीत दुर्घटना

0

नऊ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

दिल्ली(Delhi): विवेक विहार परिसरात एका चार मजली इमारतीत भीषण आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे. आज (३ मे) पहाटे लागलेल्या या आगीत आतापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर आणखी दोन जण जखमी झाले आहेत. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १४ गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता, ती काही वेळातच तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यापर्यंत पसरल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, या दुर्घटनेतून डझनभराहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. जखमींना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ६ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र इमारतीचे अनेक भाग जळून खाक झाले असून वरच्या मजल्यावरून अजूनही धूर निघताना दिसत आहे.

शाहदरा विभागाचे डीसीपी राजेंद्र प्रसाद मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्या शोधमोहीम सुरू आहे.

या दुर्घटनेत मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण ठरत असल्याचे स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा यांनी सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्याच्या मागील भागात पाच मृतदेह, तर इतर ठिकाणी आणखी चार मृतदेह आढळले आहेत. सध्या ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची आवश्यकता भासणार असून घटनेचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

Delhi Vivek Vihar Fire Accident news 4 dead over 10 rescued after massive fire at four storey building rescue operations underway marathi news Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू