Home Artical Blog बच्चू कडू शिवसेनेत, शिंदेंकडून स्वागत

बच्चू कडू शिवसेनेत, शिंदेंकडून स्वागत

0

मुंबई(Mumbai): गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाला अखेर पूर्णविराम मिळाला असून त्यांनी गुरुवार, ३० एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले.

पक्षप्रवेशावेळी बच्चू कडू म्हणाले की, “हा निर्णय केवळ राजकीय पदासाठी नसून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतला आहे. झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा तोच राहणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी काम करू.” त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे स्वागत करत, “ते मूळचे शिवसैनिकच असून आज पुन्हा आपल्या घरात परतले आहेत,” असे म्हटले. त्यांनी कडू यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी ते सातत्याने लढणारे नेते आहेत.

शिंदे पुढे म्हणाले की, बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेतून गेली अनेक वर्षे समाजकारण केले असून त्यांच्या आंदोलनांची ताकद राज्याने पाहिली आहे. कर्जमाफीसाठी केलेले आंदोलन असो किंवा दिव्यांगांच्या हक्कांसाठीचा लढा, त्यांनी नेहमीच सामान्य माणसाच्या बाजूने भूमिका घेतली. अशा लढवय्या कार्यकर्त्याच्या आगमनाने शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेचे बळ आवश्यक असल्याचे सांगत, कडू आणि शिवसेना यांचे विचारधोरण जुळणारे असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

bacchu kadu will join Shivsena eknath shinde vidhan parishad election