
नागपूर(Nagpur), दि. 30 एप्रिल 2026: थोर समाजसुधारक, ‘ग्रामगीता’ या अजरामर ग्रंथाचे रचयिता आणि खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची ज्योत पेटवणारे आधुनिक संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
नागपूर येथील काटोल रोडस्थित ‘विद्युत भवन’ या प्रादेशिक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात अधीक्षक अभियंता श्री. मंगेश वैद्य यांनी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना व्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती रिता ठाकरे यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ग्रामीण विकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी दिलेला संदेश आजही समाजासाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी महावितरणच्या प्रादेशिक व परिमंडल कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रसंतांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा संकल्प केला.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी
महावितरण, नागपूर















