
पद बरखास्त करावे..
नगरसेवक पप्पू देशमुख यांची लेखी मागणी
चंद्रपूर(Chandrapur):दि. 30 एप्रिल 2026
आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.
तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 19(6) नुसार आवश्यक कालावधीत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेच्या आत सर्वसाधारण सभा न बोलावल्यास शासनास कारवाई करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात तीन महिन्यांपर्यंत सर्वसाधारण सभा न घेणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय लांबविण्यासाठी हेतूपुरस्पर तीन महिने सर्वसाधारण सभा घेतली नाही असा नगरसेवक देशमुख यांचा आरोप आहे
महापौरांनी वैधानिक कर्तव्यांमध्ये कसूर केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 10(1) व 10(1-1अ) नुसार त्यांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. सर्वसाधारण सभेत मनपाचे आयुक्त अकनुरी नरेश यांच्यामार्फत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना देशमुख यांनी लेखी पत्र दिले.















