नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला

0

मुंबई- आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्याची मागणी मलिक यांनी केली होती. मात्र, न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळून लावला. दोन आठवड्यांनंतर त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर योग्यतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे.

नवाब मलिक यांनी याचिकेत नमूद केले आहे की, आपले एक मुत्रपिंड निकाली झाले असून दुसरे केवळ ६० टक्के काम करत आहे. आपल्याला योग्य पद्धतीने उपचार करता यावेत, यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा. ईडीने मलिकांच्या याचिकेला विरोध करताना सांगितले की, असे अनेक लोक आहेत जे एकाच किडनीवर जगू शकतात. मलिकांच्या वैद्यकीय अहवालात त्यांची दुसरी किडनी केवळ ६० टक्केच कार्यक्षम असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे मलिकांच्या केसमध्ये जामीन मंजूर करण्यात येऊ नये.