राष्ट्रवादीने ओबीसी अध्यक्ष करावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

0

 

नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरात ओबीसींच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, ओबीसींचे हित साधायचे असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा राष्ट्रीय किंवा राज्याचा अध्यक्ष ओबीसी व्यक्ती करावा असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरात काहीही झाले नाही असा थेट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये छगन भुजबळ वगळता कोणत्याही ओबीसी नेत्याला काम मिळाले नाही, यामुळे हा पक्ष ओबीसीचा शत्रू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुणीही ओबीसीचे समर्थन करणारे नेते नाहीत. त्यांनी नेहमीच ओबीसी जनतेचा घात केला, याची अनेक उदाहरणे देता येतील. या उलट भाजपाने ओबीसी समाजातील व्यक्तिला देशाचे पंतप्रधानपदाची संधी दिली.

• भाजपाला फरक पडणार नाही

तेलंगणाचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्रात विस्तार करीत असल्याच्या प्रश्नावर श्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने यावे, प्रत्येकाचे स्वागत आहे. सर्वांना त्याचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र कितीही पक्ष आले तरी भाजपाला कोणताही फरक पडणार नाही.

• महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचाच विजय

केंद्रातील पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासकामांची शिदोरी आमच्याजवळ आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी भाजपा कार्यकर्ते पोहचणार आहेत.नागपूर लोकसभेची जबाबदार आ.प्रवीण दटके तर रामटेकची जबाबदारी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना दिली आहे. दोन्ही नेत्यांना जबाबदारी दिलेल्या मतदारसंघाचा चांगला अनुभव आहे. गजभिये भाजपामध्ये मागासवर्गीयांचे नेते आहेत. त्यामुळे दोघेही आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडतील.

श्री बावनकुळे म्हणाले…

• मुख्यमंत्री नाराज नसून तसा नॅरेटिव्ह सेट केला जातोय, ते कुटुंबासह काश्मिरला गेले असावे

• शरद पवार यांना धमकी देणे योग्य नाही, सरकार योग्य कार्यवाही करणार

• कोल्हापूर दंगली प्रकरणार कार्यवाही करण्यात सरकार सक्षम आहे

• राहुल नार्वेकर उत्तम वकील असून ते सत्तासंघर्षाच्या प्रकरणात मेरीटवर निर्णय घेतील