कथेशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे – इब्राहीम अफगाण

0

कथेची मांडणी शिकण्यासाठी कथा पटकथा लेखनाच्या कार्यशाळा उपयुक्त

नागपूर: कुठलीही शिकवण, बोध, आकलन आपल्याला कथा किंवा गोष्टीच्या स्वरूपात वाचल्यावर लगेच कळून येते. महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथ हे आपल्याला त्यामधल्या छोट्या छोट्या कथांच्या स्वरूपात लक्षात असतात. त्यामुळे कथेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असून कथेशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे असे मनोगत सुप्रसिध्द पटकथालेखक आणि अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इब्राहीम अफगाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने नवोदित लेखकांसाठी दोन दिवसीय पटकथालेखन कार्यशाळेच आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आले. इब्राहीम अफगाण हे या कार्यशाळेत सहभागी लेखकांना दोन दिवस मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेच्या निमित्ताने बोलताना त्यांनी सांगितले की लेखकाच्या भावना, कल्पकता त्याला व्यक्त करता आली पाहिजे, ती योग्य रीतीने मांडता आली पाहिजे आणि त्यासाठी कथा पटकथा लेखनाच्या कार्यशाळा मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरतात. अश्या कार्यशाळांनी कथेची पटकथा कशी लिहिली जाते,कथेतील तंत्र आणि पटकथेतील तंत्र यात काय फरक आहे,कथेतील मूळ घटक आणि त्यांचा पटकथेत होणारा विकास इत्यादीसंबंधीची मूलभूत विचार, अभ्यास होतो आणि ते पुढे लेखकांच्या लिखाणाला अधिक प्रगल्भता प्रदान करते असे ते म्हणाले.

कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते झाले. पुढच्या पिढीला तयार करायचे असेल तर अश्या कार्यशाळांवर भर द्यायला हवा असे मत त्यांनी व्यक्त करून इब्राहीम अफगाण यांचा परिचय त्यांनी करून दिला. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देऊन असे उपक्रम पुढे देखील सुरु ठेवण्याचा मानस बोलून दाखविला. उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषली देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्ययिक रवींद्र शोभणे, सचिव विलास मानेकर यांची उपस्थिती होती.

चौकट
लिखाणाच्या ऍप्स दृष्टिकोण देत नाही : नुकत्याच काही कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित ऍप्स कविता, लेख, कथा तयार करून देतात. असे असले तरीही तरीही हे ऍप्स दृष्टिकोण आणि कल्पकता देऊ शकत नाहीत असे मत अफगाण यांनी व्यक्त केले. अनेकदा या ऍप्स दिशाभूल करणाऱ्या असू शकतात किंवा त्यातील मचकूर चुकीचा असू शकतो त्यामुळे त्याची मदत अत्यंत सावधगिरीने आणि केवळ एक साधन म्हणून घ्यावी आणि त्यावर विसंबून राहू नये असा सल्ला त्यांनी दिला.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा