बेळगाव, 14 मे : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. बेळगावच्या टिळकवाडी परिसरात शनिवारी झालेल्या या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान ही आक्षेपार्ह घोषणाबाजी काँग्रेस समर्थकांनी केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 तारखेला झालेल्या निवडणुकीची शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी करण्यात आली. यात काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवून भाजपाचा दारुण पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस समर्थकांनी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावरून व्हायरल होत आहेत. अशाच काही व्हिडीओ मध्ये टिपू सुलतान की जय आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेळगावमधील टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या समोर मतमोजणी केंद्राबाहेर काही अज्ञातांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही उपस्थित होते.हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर नागरिकांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत पोलिसांसमोर धरणे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत आयपीसी कलम 153 अंतर्गत एफआयआर दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे.