The Pakistani cricket team is still not allowed to play in India
इस्लामाबाद Islamabad : क्रिकेटचा महाकुंभ म्हणविल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक बुधवारी जाहीर झाले असताना पाकिस्तानी क्रिकेट संघाला अद्याप तेथील सरकारने भारतात खेळण्यासाठी परवानगी दिलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याबाबत एक निवेदन जारी केले. त्यात हा खुलासा केला आहे. पीसीबीने सांगितले की, वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याबाबत पाकिस्तान सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) प्रतिक्रिया दिली असून पीसीबीने वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला असल्याने संघ यातून मागे हटणार नाही, याबाबत आम्हाला विश्वास वाटतो. या स्पर्धेत बाद फेरीपूर्वी पाकिस्तानला 9 सामने खेळावे लागणार आहेत. स्पर्धेत क्रिकेट रसिकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार १५ ऑक्टोबर अनुभवायला मिळणार आहे.
भारतातील कोणत्याही दौऱ्यासाठी पीसीबीला पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागते. भारतात ज्या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत, त्या ठिकाणांसाठीही आम्हाला परवानगी घ्यावी लागेल, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे.पीसीबीने नमूद केलेय की आम्हाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. वर्ल्डकपसाठी गाईडलाईन्स मिळाव्या, यासाठी आम्ही सरकारच्या सतत संपर्कात आहोत. सरकारकडून कोणतीही सूचना आल्यावर आम्ही त्याबाबत आयसीसीला कळवू, असे पीसीबीने नमूद केले आहे.
भारतात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पीसीबीने काही अट ठेवल्या होत्या.भारतातील काही शहरांमध्ये आम्हाला सामने खेळता येणार नाही, अशी भूमिका पीसीबीने घेतली होती. मात्र, पीसीबीची एकही अट मान्य करण्यात आलेली नाही,असे काल जाहीर झालेल्या वेळा स्पष्ट झाले आहे.