महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय-राज ठाकरे

0

मुंबईः सध्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, ती यापूर्वी कधीही नव्हती. कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, अशी परखड टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS President Raj Thackeray) केलीय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गुढीपाडव्याला सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे संकेतही राज ठाकरे यांनी दिलेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पनवेल येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला असता म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहे, असे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी विधानभवनात गेलो होतो. त्यावेळी सगळे बसले होते. मला कळतच नव्हते कोण कोणत्या पक्षातला. सध्या कोणी आमदार आला की कुठल्या पक्षाचा हे विचारावे लागते. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी लतादीदींवरील एका प्रकल्पाची माहिती यावेळी दिली. आम्ही लतादीदींवर एक पुस्तक तयार करीत असून त्यांच्या वाढदिवशी हे पुस्तक आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. व्यंगचित्रामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. मी फक्त पुस्तके वाचत नाही तर चेहरेसुद्धा वाचतो. त्यामुळे कोण सोबत राहणार आणि कोण जाणार, हे कळते असेही ते म्हणाले.