संविधान उद्देशिका आदिम माडिया भाषेत

0

सामाजिक कार्यकर्त्यांचा स्तुत्य पुढाकार

गडचिरोली gadhchiroli :  जंगलातील डोंगर, दऱ्यांमध्ये वसलेला आदिवासी समाज कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिला आहे. या समाजाने सांस्कृतिक वसा जोपासला. पण, विकासापासून लांबच आहे. संविधानाने त्यांना उत्कर्षाची वाट प्रशस्त करून दिली असली तरी संविधान (Constitution ) हा शब्दही त्यांच्या कानावर कधी पडला नाही. पाथ संस्थेने गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District ) केलेल्या सर्वेक्षणात ही बाब अधोरेखित झाली. जिल्ह्यातील (Bhamragarh, Etapalli, Aheri, Dhanora and Chhattisgarh in remote Naxal infested areas) नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज वास्तव्यास आहे. मागील वर्षी आदिवासी बांधवांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल 94 टक्के माडिया समाज बांधवांनी ‘संविधान’ हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेता भामरागड येथील माडिया समाजातील पहिले वकील ॲड. लालसू नोगोटी, हेमलकसा येथील चिन्ना महाका व चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचा (Preamble to Indian Constitution ) स्थानिक आदिम माडिया भाषेत अनुवाद केला. याप्रयत्नातून संविधान तळागळापर्यंत रूजण्यास मदती होईल, असा त्यांचा विश्वास आहे.

माडिया हा जल, जंगल, जमिनीवर उपजीविका करणारा समुदाय आहे. शिक्षणाची कमी, त्यामुळे जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक आहे. स्वतंत्र बोलीभाषा व संस्कृती या समुदायाची ओळख. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही मूलभूत गरजांचीच पूर्तता अद्याप या परिसरात होऊ शकलेली नाही. हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी या समुदायासाठी नित्याचीच बाब झाली आहे. संविधानाचे दिलेल्या अधिकारांची माहिती त्यांना व्हावी, हा उद्देश समोर ठेवून संविधान उद्देशिका स्थानिक भाषेत अनुवादित करण्यात आली आहे. संविधानाबाबत जनजागृती निर्माण झाल्यास कालांतराने हक्काबाबत, देशाचे संविधान अवलंबण्याबाबत आमुलाग्र बदल होईल.

संविधान तळागाळात- घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी अन् त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला असल्याचे ॲड. लालसू नोगोटी, चिन्ना महाका, अविनाश पोईनकर यांचे म्हणणे आहे. सुमारे महिनाभरापासून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड व प्रस्तावित ६ खदाणींच्या विरोधात येथील माडिया आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. तोडगट्टा येथे परिसरातील ७० ग्रामसभा व सुरजागडपट्टी पारंपारिक इलाका गोटूल समीतीच्या वतीने रोज शेकडो नागरिक शांतता व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे. या आंदोलनात माडिया भाषेतील संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन पहिल्यांदाच करण्यात आले.